Wednesday 25 April 2018


जन्मशताब्दी मानवंदना लेख:


तेजस्वी कलावंत..शाहू मोडक!


- मनोज कुलकर्णी 


पडद्यावर श्रीकृष्ण म्हणून मान्यता पावलेले..शाहू मोडक!

शाहू मोडक यांनी बालकृष्ण रंगवलेल्या 'श्यामसुंदर' (१९३२) 
या पहिल्या रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपटाची जाहिरात!

पौराणिक व सामाजिक चित्रपटांतून अविस्मरणीय व्यक्तिरेखा रंगवलेले आणि एक आख्यायिका झालेले कलावंत शाहू मोडक यांची आज जयंती!..त्याचबरोबर जन्मशताब्दी वर्षही!

अहमदनगर इथे मराठी ख्रिश्चन परिवारात जन्मलेले शाहू मोडक यांनी कीर्ति संपादली ती पडद्यावरील श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर म्हणून! १९३२ मध्ये भालजी पेंढारकर यांच्या 'श्यामसुंदर' या पहिल्या रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपटातून ते सर्वप्रथम बालकृष्ण म्हणून पडद्यावर अवतरले..आणि त्यांची पूज्य प्रतिमा पुढे होत गेली!
'प्रभात' च्या मानदंड 'माणूस' (१९३९) चित्रपटात शाहू मोडक!

यांतही १९३९ मध्ये 'प्रभात फिल्म क.' च्या व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या 'माणूस' चित्रपटात त्यांनी वारांगनेचा उद्धार करणाऱ्या प्रामाणिक पोलिसाची भूमिका तितकीच वास्तवपूर्ण साकारली! तर १९४० साली 'प्रभात' च्याच विष्णुपंत दामले व फत्तेलाल शेख़ यांनी दिग्दर्शित केलेल्या 'संत ज्ञानेश्वर' मध्ये त्यांनी ती व्यक्तिरेखा अप्रतिम साकारली!
'पहिली मंगळागौर' (१९४२) चित्रपटात शाहू मोडक व स्नेहप्रभा प्रधान!

१९४२ मध्ये गजानन जहागिरदार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वसंतसेना' मध्ये ('श्यामची आई' प्रसिद्ध) वनमाला वसंतसेना होत्या आणि शाहू मोडक रुबाबदार चारुदत्त झाले होते! याच वर्षी 'पहिली मंगळागौर' या लता मंगेशकर यांनी (अपवादात्मक) काम केलेल्या चित्रपटात स्नेहप्रभा प्रधान यांच्याबरोबर त्यांची प्रमुख भूमिका होती!

शाहू मोडक यांनी मराठी बरोबर हिंदी मध्येही भूमिका रंगवल्या. यांत १९४३ च्या ए. आर. कारदार यांच्या 'क़ानून' या हिंदी-उर्दू चित्रपटात त्यांनी मेहताब बरोबर नायक म्हणून काम केले! १९४८ चा 'माया बाजार' खूप गाजला! १९६२ मध्ये पुन्हा त्यांचीच भूमिका असणारा 'संत ज्ञानेश्वर' हा हिंदी चित्रपट खूप लोकप्रिय ठरला..मणिभाई देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटास संगीत दिले होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी! यातील लता मंगेशकर यांनी हृद्य गायलेले "ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो.." (या गाण्याशी माझी बालपणीची आठवण निगडित आहे..ती म्हणजे ते ऐकल्याशिवाय मी झोपत नसे!) माझ्या स्मरणात कायम ते राहील!
'संत ज्ञानेश्वर' (१९६२) चित्रपटात शाहू मोडक!
कालांतराने शाहू मोडक चरित्र भूमिका रंगवू लागले. यांत १९७९ मध्ये गुलज़ार यांच्या हेमा मालिनी ने साकारलेल्या 'मीरा' चित्रपटात ते होते. पुढे उमा भेंडे यांच्या 'भालू' (१९८०) या मराठी आणि कमाल अमरोही यांच्या 'रज़िया सुल्तान' (१९८३) या हिंदी-उर्दू चित्रपटात ते येऊन गेले! तर १९८६ मध्ये 'कृष्णा कृष्णा' मध्ये ते शेवटचे पडद्यावर आले ते सांदीपन ऋषि म्हणून आणि १९९३ मध्ये हे जग सोडून गेले!

पडद्यावर पौराणिक चित्रपटांतून भूमिका रंगवलेले शाहू मोडक हे खऱ्या जीवनात मोठे प्रागतिक विचारांचे होते! पूर्वी एका कार्यक्रमात ओझरते भेटलेल्या त्यांचा तेजस्वी चेहरा मला आठवतोय!

त्यांस माझी विनम्र सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी
 ['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment