Monday 17 September 2018

गेले ते दिन गेले! 


मी तसा धार्मिक नाही; पण गणेशोत्सव चालू असताना काल एकदम पूर्वीचे म्हणजे कुमार वयातील दिवस आठवले! तेंव्हा आम्ही सदाशिव पेठेत (आजच्या भाषेत सिटीत) राहत होतो. आता कोरेगाव पार्क (फेमस 'केपी') सारख्या कॉस्मोपॉलिटन भागात राहायला येऊन २५ वर्षें झाली. पण तरीही पूर्वीचे पेठेतील उत्सवी वातावरण आणि अनेकविध सांस्कृतिक कार्यांतील सहभाग..येथील पार्कातील उच्चभ्रू वातावरणातही आठवतो!

आपल्याकडे एक तर सण भरपूर! चैत्र पाडव्यापासून ते सुरु होतात..त्या सुमारास तळेगाव (दाभाड़े) येथे आमच्या (काकांच्या) घरी तेथील जत्रेसाठी जाणे व्हायचे. बालपणीच्या काळात ती मौज वाटायची! नंतर आषाढ़ महिन्यात पालख्या यायच्या तेंव्हा घरच्या मोठ्यांबरोबर लक्ष्मी रस्त्यावर त्यांसाठी जायचो. मग एकादशीला विविध प्रकारचा उपवासाचा फराळ खाणे होई..त्यातही साबुदाण्याची खिचड़ी ही अतिप्रिय..केवळ त्यासाठी असे दिवस चांगले वाटत! 

या प्रसंगी एक हृदय आठवण सांगायची म्हणजे त्या काळात आम्ही राहत असलेल्या (नागनाथ पाराजवळील) भागातून एक वृद्ध एकतारी वर "ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो.." हे गाणे गात जायचा. ते ऐकविण्यासाठी माझे आजोबा (ज्यांचा मी लाड़का होतो) रात्री फूटपाथवर मला कडेवर घेऊन थांबत, कारण ते ऐकल्याशिवाय मी झोपत नसे! कालांतराने 'संत ज्ञानेश्वर' चित्रपटातील ते गाणे नि त्यातील अभिनय-भावार्थ अनुभवताना हेलावून गेलो. वाटले संतांना जीवंत असताना समाजाने छळले आणि आता त्यांच्या सोन्याच्या पालख्या काढ़तायत याला काय म्हणावे?

मग श्रावण तर समृद्ध निसर्गा बरोबर नागपंचमी व 'राखी पौर्णिमे' सारखे काही पारंपारिक, तर काही नातेसंबंध जपणारे सण घेऊन यायचा. मग घरी गोड नारळी भाताचा बेत आणि (सख्खी बहिण नसतानाही) अनेक चुलत-आत्ये बहिणींच्या विविधरंगी राख्या हातावर यायच्या. त्यातली लाडक्या बहिणीची राखी नंतर काढवत नसे! दही हंडी उत्सवात गल्लीत सगळ्यांच्या आनंदात नाचत सहभागी व्हायचो. भाद्रपद येताच गणेशोत्सवाचे वेध लागत. कारण आम्ही राहायचो त्या आपटे वाड्यात सार्वजनिक मंडळ स्थापन केले होते. तिथे गणपती बसवून सांस्कृतिक कार्यक्रम करायचो. त्यांत तेथीलच हौशी आपले कलागुण सादर करायचे. त्या काळात सर्वांमध्ये एक जिव्हाळ्याचे वातावरण प्रस्थापित व्हायचे! 

'परख' चित्रपटातील "बरखा बहार आयी.." ह्या गाण्यातील (पत्र्याच्या छतातून वाहणाऱ्या पागोळ्यांचे) वास्तव आम्ही तिथे राहताना प्रत्यक्ष अनुभवले! तसेच तेंव्हा आमच्याकडे प्रथम टेलीविज़न आल्यावर वाड्यातील सर्व जण 'छायागीत' नि चित्रपट पाहण्यासाठी आमच्या इथे जमा होत. सामुहीक कला-आस्वादाचा अनोखा आनंद त्यातून सर्वांना मिळे!

आमचे संयुक्त कुटुंब होते आणि वडील मोठे असल्याने कुळधर्म आणि गणपती नि गौरींसाठी काका, आत्या नि त्यांची कुटुंबे जमायची. दसरा-दिवाळीत पण एकत्र स्नेहभोजन व्हायचे! आमच्या ('आदर्श शिक्षिका' सन्मानित) आईने सर्वांचेच मोठेपणाने खूप केले. तिच्याच पुण्याईने आज (तिच्या) मालकीच्या प्रशस्त घरात आम्ही राहतोय! रामायण-महाभारताच्या गोष्टींनी नेहमीच आमच्यावर चांगले संस्कार करणारे आजोबा विजयादशमी (दसरा) ते नरकचतुर्दशी (दिवाळी) सारख्या दिवसांबाबतची महती कथन करायचे!..अक्काआजी कडूनही संस्कार नि लाड व्हायचे!

लहानपणी दिवाळीचे मोठे अप्रूप असायचे..नवीन कपडे, पहाटे उठून सुवासिक तेल-उटणे लावून आंघोळी, (वाटून आलेले) फटाके वाजवणे मग खास फराळ..आणि शाळेला दिवाळीची सुट्टी त्यामुळे धमाल! यांत व्हिडीओ आणून आवडीचे चित्रपट पाहणे होतेच; कारण तोपर्यंत केबल नेटवर्क आलेले नव्हते! आता सर्व चित्रच बदललेय..नवीन कपडे मनात आले की घेतले जातात, चकली-लाडू सारखे पदार्थ केंव्हाही समोर येतात आणि श्रीखंड-गुलाबजाम ची स्वीट डिश जेवणात कधीही असते!

आपल्या सणांबरोबरच ईद नि नाताळ सारखे उत्सव पण मी महाविद्यालयीन मित्रांबरोबर साजरे करीत आलोय. चित्रपटा प्रमाणेच शेरो-शायरीची ही आवड असल्याने ईद च्या दिवसांत मुशायरा ऐकायला जाणे, बिर्याणी-शिरखुर्मा ची लज्जत घेणे..आणि ख्रिसमस ला खास कॅम्प मध्ये जाऊन मेन स्ट्रीट वर रंगीन वातावरणात संध्याकाळी फिरणे आणि केक-चहाचा गप्पांसाह आस्वाद घेणे..हे होत आलेय! होळी-रंगपंचमी सुद्धा सर्व रंगांची नि सर्वांबरोबर खेळत असू!

आता आधुनिक युगात परंपरा तशाच जोपासणे शक्य नाही आणि सणांचे ते अप्रूपही नाही! आपल्या क्षेत्रात आपली आवड जोपासणे हयातच स्वारस्य वाटते. त्यामुळे दिवसभर चित्रपट विश्वात (कॉम्पुटर वर) लिखाणाच्या माध्यमातून रमून जातो! कधी शायरीत लेखणी आजमावतो! मात्र अशा दिवसांत एकांतात मन कधीतरी सणासुदीच्या पूर्वीच्या दिवसांत जाते..ज्यांत निखळ आनंद होता; आपलेपणा, वात्सल्य, निरागसता व प्रेम होते..जे आजच्या धकाधकीच्या जीवनात दुरावलेय!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment