Wednesday 19 May 2021

चौकट छेदणारी समर्थ अभिनेत्री..रीमा!

रीमा यांच्या अभिनय मुद्रा!

रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणी यांवर विविधरंगी व्यक्तिरेखांद्वारे आपल्या अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या रीमा यांस जाऊन आता चार वर्षे झाली!

'सिंहासन' (१९७९) या डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपटात..रीमा!
रीमा लागू ह्या अभिनेत्रीस सर्वप्रथम पडद्या वर पाहीले ते 'सिंहासन' (१९७९) या डॉ.जब्बार पटेल यांच्या राजकीय समांतर मराठी चित्रपटात. त्यात डॉ.लागूं सारख्या दिग्गज कलाकारांच्या मांदीयाळीत पुरुष प्रधान - संस्कृतीत आपले स्थान निर्माण करणाऱ्या महत्वाकांक्षी स्त्रीच्या रूपात ती दिसली..नि जाणवले की सरधोपट स्त्री भूमिकांत ही बंदिस्त होणारी नाही..आणि पुढे हे प्रत्ययास आले!

 
पुण्यात 'हुजूर पागा' शाळेत असतानाच आपल्या आई मंदाकिनी भडभडे यांच्या प्रोत्साहनाने त्यांच्याबरोबर मूळच्या या नयनने रंगभूमीवर पाऊल ठेवले होते..आणि पुढे मराठी नाटकांत वैशिष्ट्यपूर्ण भूमिकां रंगवल्या. त्यांतही मुख्यत्वे 'पुरुष' व 'सविता दामोदर - परांजपे' सारखी समांतर रंगभूमीवरील सामाजिक समस्याप्रधान नाटके होती..आणि (अभिनेते विवेक लागूंबरोबरील विवाहानंतर) रीमा लागू ही समर्थ अभिनेत्री नावारुपास आली!

अरुणा राजे यांच्या 'रिहाई' (१९८९) चित्रपटात रीमा!
१९८० मध्ये शशी कपूर निर्मित व श्याम बेनेगल दिग्दर्शित.. 'कलयुग' ने तिने हिंदी चित्रपटात पदार्पण केले..आणि यातही कुलभूषण खरबंदा बरोबरील अवखळ भूमिकेत तिने पारंपरिक चौकटीस छेद दिला!..पुढे अरुणा राजे यांच्या 'रिहाई' (१९८९) मध्ये तर रीमाची बंडखोर भूमिका - वादग्रस्त ठरली!

दरम्यान १९८५ मध्ये 'खानदान' या हिंदी मालिकेद्वारे तिने टेलीविज़न वर पदार्पण केले होते..आणि पुढे 'मानाचा मुजरा' या मराठी कार्यक्रमात ही आली! तर सुप्रिया पिळगांवकर बरोबरील तूफान गाजलेल्या 'तू तू मैं मैं' मालिकेतील विनोदी भूमिकेने तिला 'इंडिया टेली अवार्ड' मिळाले!

सुप्रिया पिळगांवकर बरोबर 'तू तू मैं मैं' या दूरचित्रवाणी मालिकेत मध्ये रीमा!
निरुपा रॉय नंतर बॉलीवुडची नवी आई..म्हणून तिच्या कारकिर्दीस (नकळत ) वेगळे वळण दिले ते नासिर हुसैन यांच्या 'क़यामत से क़यामत तक' (१९८८) या आमीर खान नायक म्हणून आलेल्या चित्रपटाने..याची नवोदित नायिका जूही चावलाची आई रंगवली रीमा ने! पुढे सूरज बड़जात्या च्या पहिल्या हिट 
'मैंने प्यार किया' (१९८९ ) या सलमान खान ला स्टार - करणाऱ्या चित्रपटात ती त्याची आई झाली..ते मग राम गोपाल वर्माच्या हिट 'रंगीला' (१९९५) मध्ये उर्मिला मातोंडकर ची आई...हे चालू राहिले!
'वास्तव' (१९९९) चित्रपटात संजय दत्तची आई..रीमा!

यातही तिच्या आई प्रतिमेस वेगळे परिमाण देणारी - व्यक्तिरेखा महेश मांजरेकर च्या 'वास्तव' (१९९९) या चित्रपटात तिला मिळाली..बिघडलेल्या बाबा संजय दत्त ची आई - रंगवताना तिने अखेर मोठी कणखर भूमिका घेतली..या वाममार्गास लागलेल्या मुलावर गोळी झाडणारी! काहीशी 'मदर इंडिया' (१९५७) तील सुनील दत्त ची माता साकारणाऱ्या नर्गिसची आठवण यावेळी झाली!..आणि तिलाही मनोमन ही भावली असावी असे वाटले!

मराठी चित्रपटांतूनही ती वैशिष्ठयपूर्ण भूमिका करीत राहिली..यांत 'रेशमगाठ' (२००२) साठी तिला 'सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री' चा पुरस्कार मिळाला. 'जन्म' (२०११) मधील भूमिका तिला व्यक्तिशः आवडलेली! तिची कन्या मृण्मयी लागूही रंगभूमी, टी.व्ही. व चित्रपट यांतून अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रांत कार्यरत आहे.

रीमा यांस शासनाचा 'व्ही. शांताराम पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले!..अभिनयाची चतुरस्त्र कारकीर्द असणाऱ्या अशा या अजूनही चांगल्या उमेदीत असणाऱ्या अभिनेत्रीस अशी लवकर एक्झिट घ्यावी लागली याची हुरहुर वाटते!

माझी ही सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment