Monday 10 May 2021

प्रतिभासंपन्न कवी-गीतकार खेबूडकर!

लोकप्रिय कवी-गीतकार जगदीश खेबूडकर!
"धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना..
शब्दरूप आले मुक्या भावनांना"

'धाकटी बहीण' (१९७०) चित्रपटातील "धुंदी कळ्यांना.." गीतात सुंदर लोभस अनुपमा!
रम्य संध्याकाळी आमच्या बगिच्यात हळुवार वाऱ्याच्या झुळुकीसह..काही आवडत्या मराठी प्रेमगीतांपैकी हे कानांत रुंजी घालू लागले!..त्यावरील सुंदर अनुपमाची लोभस प्रणयी मुद्रा डोळ्यासमोर आली!...हे लिहिणारे कवी जगदीश खेबुडकर यांचा आज जन्मदिन!

तसे खेबुडकर अस्सल कोल्हापूरच्या मातीतले कवी. कुमार वयातच त्यांनी महात्मा- गांधींवर कविता लिहिली! पुढे शिक्षकी पेशात ते आले. तेंव्हा लोकगीत प्रकारात ते लिहीत गेले. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांची अशी गीते आकाशवाणीवर प्रसारित होत गेली. सुप्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांच्या ऐकण्यात ती आली आणि त्यांनी खेबूडकरांना चित्रपट गीतलेखन करायला बोलावले.

'सवाल माझा ऐका' (१९६४) चित्रपटात अरुण सरनाईक व जयश्री गडकर!
यातील "सोळावं वरीस धोक्याचं.." ही सुलोचना चव्हाण यांनी गायलेली लावणी गाजली!
तो काळ (तमाशाप्रधान) ग्रामीण मराठी चित्रपटाचा होता. साहजिकच खेबूडकरांना प्रथम लावणी लिहायला लागली. राजा ठाकूर यांच्या 'रंगल्या रात्री अशा' (१९६२)  चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली "नांव गांव कशाला पुसता.." ही वसंत पवार यांच्या संगीतात लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गायली. यानंतर 'वाघ्या मुरळी', सवाल माझा ऐका' (१९६४) सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अशा धर्तीची फक्कड गीते लिहिली!

'साधी माणसं' (१९६५) चित्रपटात सूर्यकांत आणि जयश्री गडकर!
यानंतर एकदम चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांच्या 'साधी माणसं' (१९६५) या ग्रामीण सामाजिक चित्रपटासाठी खेबूडकरांनी लिहिलेले "ऐरणीच्या देवा तुला.." हे आनंदघन म्हणजेच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी संगीतबद्ध करून गायले. तर 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' (१९६७) मधील प्रभाकर जोग यांच्या संगीतात लता मंगेशकर यांनी गायलेले त्यांचे "शुभंकरोती कल्याणम्.." हे तर संस्कारक्षम पाठ देणारेच होते! यानंतर कमलाकर तोरणेंच्या 'आम्ही जातो आमुच्या गावा' (१९६८) चित्रपटातील त्यांचे "देहाची तिजोरी.." हे बाबूजी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून गायले. त्यांनी लिहिलेली असली भक्तिगीतं सामाजिक नि नैतिकतेचे संदर्भ असणारी होती!

'पिंजरा' (१९७३) तील "ज्वानीच्या आगीची मशाल हाती.." या गीत-नृत्यात संध्या!

यानंतर अनंत मानेंच्या 'एक गाव बार भानगडी' (१९६८) चित्रपटाने खेबुडकर पुन्हा ग्रामीण लोकसंगीताची बाज असलेल्या गीतलेखनाकडे वळले. मग चित्रपती व्ही.शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७३) चित्रपटा साठी त्यांनी लिहिलेल्या व राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या अशा (तमाशाप्रधान) गीतांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला! यांतील "ज्वानीच्या आगीची मशाल हाती.." अशा उषा मंगेशकरांनी गायलेल्या गीतांवरील संध्याची नृत्ये नेत्रदीपक होती! पुढे १९७५ मध्ये किरण शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या शहरी माहोलच्या 'झुंज' (१९७५) मधील त्यांचे "कोण होतास तू...कोण होतीस तू.." हे जुगलबंदी गीत गाजले. तर तोरणेंच्या 'ज्योतिबाचा नवस' (१९७५) मधील "ही दुनिया हाय एक जत्रा.." सारखी त्यांची गीतं ग्रामीण बाज घेऊन लोकप्रिय होत होती.

'सुशीला' (१९७८) चित्रपटातील "कुण्या गावाचं आलं पाखरू.." गाण्यात रंजना!

खेबूडकरांनी वेगळ्या धर्तीच्या चित्रपटांसाठी पण गीत लेखन केले. यांत डॉ. जब्बार पटेल यांचा समांतर सिनेमा 'सामना' (१९७५) होता; तर अनंत मानेंचे सामाजिक 'सुशीला' (१९७८) व 'झेड पी' (१९९१) होते!

आपल्या सुवर्ण महोत्सवी चित्रपट कारकिर्दीत जगदीश खेबूडकरांनी सुमारे ३०० मराठी - चित्रपटांसाठी जवळपास अडीच हजार गाणी लिहिली! ह्यांपैकी काही चित्रपट हे राष्ट्रीय व राज्य पातळी वर गौरविले गेले! ते सुद्धा सन्मानित झाले!

मराठी चित्रपटसृष्टीत "नाना" म्हणून संबोधले गेलेल्या खेबूडकरांना ही सुमनांजली!!


- मनोज कुलकर्णी

 

No comments:

Post a Comment