Saturday 5 June 2021

सहृदय वात्सल्यमूर्ती!



दिग्गज अभिनेत्री..सुलभा देशपांडे!

रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांतून आपल्या स्वाभाविक अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे हे जग सोडून आता पाच वर्षें झाली!

भावपूर्ण भूमिकेत सुलभा देशपांडे!
मला आठवतंय चित्रपट पत्रकारितेच्या पदार्पणातील काळात मी 'हेच माझे माहेर' (१९८४) या राजदत्त दिग्दर्शित चित्रपटाचे परीक्षण लिहिले होते..त्यात सुलभा देशपांडेंची अनोखी व्यक्तिरेखा होती..नातसून आल्यावर सुनेच्या बाजूने खंबीरपणे उभी राहणारी सासू! पुढे अशा सहृदय आगळ्या भूमिका त्यांनी पडद्यावर सहज रंगविल्या.

१९६०च्या दशकात प्रायोगिक रंगभूमी चळवळी तील सुलभा देशपांडे हे एक अग्रणी नाव होते. याच काळात विजय तेंडूलकर यांच्या 'शांतता कोर्ट चालू आहे' (१९६७) मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका प्रभावीपणे रंगवली! १९७१ मध्ये पती अरविंद देशपांडे यांसह त्यांनी 'आविष्कार' या नाट्य संस्थेची स्थापना केली आणि समांतर रंगभूमी समृद्ध करण्यास हातभार लावला. पुढे लहान मुलांसाठी 'चंद्रशाळा' संस्था स्थापन करून १९८२च्या सुमारास 'दुर्गा झाली गौरी' सारखी बालनाट्ये त्यांनी सादर केली. याद्वारे पुढे आलेल्या कलाकारांतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे.. उर्मिला मातोंडकर!

'चौकट राजा' (१९९१) चित्रपटात सुलभा देशपांडे व दिलीप प्रभावळकर!
१९७० व १९८० च्या दशकांत जोरात असलेल्या समांतर चित्रपटांतून सुलभा देशपांडे यांनी उल्लेखनीय स्त्री - व्यक्तिरेखा साकारल्या. यांत जब्बार पटेलांचा 'जैत रे जैत', श्याम बेनेगलांचा 'कोंडुरा', सैद मिर्झांचा 'अरविंद देसाई की अजीब दास्तान', मुझफ्फर अलींचा 'गमन' ते..पुढे मीरा नायरचा 'सलाम बॉम्बे' असे वैविध्यपूर्ण चित्रपट होते. 
नंतर संजय सुरकरच्या 'चौकट राजा' (१९९१) मधील मानसिक विकलांग मुलाचा सांभाळ - करणाऱ्या मातेची त्यांची भूमिका हृदयाला भिडली!

'इंग्लिश विन्ग्लीश ' (२०१२) या श्रीदेवीच्या पुनरागमन चित्रपटात व 'कहेता है दिल जी ले जरा' (२०१३) या दूरचित्रवाणी मालिकेत सुलभा देशपांडे दिसल्या. मराठी-हिंदी चित्रपट व मालिका असा त्यांचा अभिनय प्रवास होता!

'संगीत नाटक अकादमी' ते 'जीवन गौरव' असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले!

त्यांस विनम्र श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment