Friday 13 July 2018

भारदस्त अभिनेते निळू फुले!

स्मरण निळूभाऊंचे.!


- मनोज कुलकर्णी 



डॉ. जब्बार पटेल यांच्या 'सामना' (१९७४) मध्ये निळू फुले!
रंगभूमी व मराठी-हिंदी चित्रपटांतून आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवणारे भारदस्त अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृतिदिन!

'कथा अकलेच्या कांद्याची' या गाजलेल्या लोकनाट्यापासून अभिनय कारकीर्द सुरू झालेल्या निळू फुले यांनी..रुपेरी पडद्यावर पदार्पण केले ते अनंत माने यांच्या 'एक गाव बारा भानगडी' (१९६८) या मराठी चित्रपटातून...त्यातील त्यांची इरसाल झेलेअण्णा ही व्यक्तिरेखा जणू त्यांची पडद्यावरील प्रतिमेची नांदीच होती!
तडफदार अभिनेते निळू फुले!

प्रामुख्याने ग्रामीण ढंगाच्या खलनायकी भूमिका केलेल्या निळू फुले यांनी निवडक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखाही साकारल्या...उदाहरणार्थ व्ही.शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७२) या लोकप्रिय चित्रपटातील त्यांची वैशिष्ठ्यपूर्ण भूमिका! तसेच डॉ. जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' (१९७९) मधील त्यांची पत्रकाराची भूमिकाही लक्षवेधी होती!

मराठी बरॊबरच हिंदी चित्रपटांतूनही निळू फुले यांनी आपले अस्तित्व प्रकर्षाने दर्शवले..मग महेश भट्ट यांचा 'सारांश' (१९८४) असो; नाहीतर मनमोहन देसाईंचा 'कुली' (१९८३) हा सुपरस्टार अमिताभ बच्चनचा बहुचर्चित चित्रपट!

सुमारे २५० चित्रपटांतून निळूभाऊंनी काम केले..मात्र 'राष्ट्र सेवा दला'त काम केले असल्याने त्यांना समाजकार्याबाबत आस्था होती!..जाहीर कार्यक्रमांत खादीच्या झब्बा-पायजम्यात येऊन ते विनयशील बोलत!

त्यांची समाजवादी विचारसरणी 'हीच खरी दौलत' (१९८०) चित्रपटात त्यांनी साकारलेल्या या गाण्यातून प्रतिबिंबीत होते...

"रंजल्या जिवाची मनी धरी खंत..
तोचि खरा साधू..तोचि खरा संत.."

No comments:

Post a Comment