Monday 30 July 2018

दिग्गज संगीतकार-गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी!

बाबूजी स्मरण..जन्मशताब्दी लेख:


- मनोज कुलकर्णी



"तोच चन्द्रमा नभात..तीच चैत्रयामिनी..
एकांती मज समीप..तीच तूही कामिनी.."

अलिकडेच चंद्रग्रहण झाले..पण माझ्या मनात चंद्राचा संदर्भ असलेली काही हळूवार प्रणयी गीतें रुंजी घालीत होती..त्यांत अभिजात हिंदी बरोबरच होते ते बाबुजींनी संगीतबद्ध केलेले व गायलेले (शांता शेळके यांचे) हे मधूर गीत!

मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील सुगमसंगीतातील एक अध्वर्यु असलेले सुधीर फडके अर्थात बाबूजी यांचा काल स्मृतिदिन होता..त्याच्या तीन दिवस आधी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले!
प्रख्यात त्रिकुट.. चित्रपटकार राजा परांजपे, संगीतकार-गायक सुधीर फडके 
व लेखक गीतकार ग. दि. माडगूळकर! 

कोल्हापूर येथे जन्मलेले राम फड़के..म्हणजेच सुधीर फडके यांनी १९४१ मध्ये 'एच एम् व्ही' मध्ये आपली गायन कारकीर्द सुरु केली आणि १९४६ मध्ये नामांकित 'प्रभात फिल्म कंपनी' त संगीत दिग्दर्शक म्हणून ते रुजू झाले!

विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून नाव कमावलेल्या सुधीर फड़के यांनी सुरुवातीस हिंदी चित्रपटांस संगीत दिले..'गोकुळ' चित्रपटासाठी क़मर जलालाबादी यांची गीते स्वरबद्ध केल्यावर, १९४७ मध्ये 'प्रभात' च्या 'आगे बढ़ो' अशा समयोचित चित्रपटास त्यांनी संगीत दिले..यशवंत पेठकर दिग्दर्शित ह्या चित्रपटाचा नायक होता देव आनंद..आणि याची नायिका असलेल्या ख़ुर्शीद बरोबर गाणी गायली होती मोहम्मद रफ़ी यांनी! (पुढे बाबुजींच्या लग्नात रफ़ी यांनी मंगलाष्टके म्हंटली होती असे सांगतात!)

प्रसिद्ध गायिका आशा भोसले संगीतकार सुधीर फडके!

'जगाच्या पाठीवर' (१९६०) मध्ये बाबुजींचे  
"एक धागा सुखाचा.." साकार करताना राजा परांजपे!

१९४८ मध्ये मग राजा परांजपे यांच्या 'जीवाचा सखा' द्वारे त्यांनी मराठी चित्रपटास संगीत देण्यास सुरूवात केली..ह्याची पटकथा व गीते ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली होती आणि इथूनच राजाभाऊ-गदिमा व बाबूजी हे प्रसिद्ध त्रिकुट जमले! मग त्यांच्या 'पुढचं पाउल' (१९५०) सारखे ते एकत्र कायम पुढेच जात राहिले..आणि 'लाखाची गोष्ट' (१९५२) निर्मित गेले..आशा भोसले यांनी गायलेले "सांग तू माझा होशील का.." सारखी अवीट गोडीची गाणी यात होती. नंतर 'जगाच्या पाठीवर' (१९६०) मध्ये तर या त्रिकुटाच्या बाबुजींनीच गायलेल्या "एक धागा सुखाचा.. " सारख्या अर्थपूर्ण गाण्यांनी कमाल केली!


'भाभी की चुडिया' (१९६१) चित्रपटात "ज्योति कलश छलके.." गाण्यात मीना कुमारी!
दरम्यान बाबुजींनी अन्य चित्रपटकर्त्यांसाठी पण संगीत दिग्दर्शन केले..यामध्ये राम गबाले ('जशास तसे'/१९५१), राजा ठाकूर ('मी तुळस तुझ्या अंगणी'/१९५५) आणि मधुकर तथा बाबा पाठक ('प्रपंच'/१९६१) यांचा प्रामुख्याने समावेश होता! तसेच राजा परांजपे यांच्या 'सुवासिनी' (१९६१) सारख्या चित्रपटांतील गाजलेली जोड़ी रमेश देव-सीमा यांच्या निर्मितीतील 'या सुखांनो या' (१९७५) चित्रपटासही बाबुजींनी संगीत दिले आणि यात त्यांनी गायलेले शिर्षकगीतही सुखावह होते!


बाबुजींनी संगीत दिलेल्या काही अभिजात मराठी चित्रपटांच्या हिंदी आवृत्यांना पण त्यांनीच संगीतबद्ध केले..यांत प्रामुख्याने नमूद करायचा तो सुलोचनाबाईंच्या हृदय व्यक्तिरेखेने अजरामर झालेल्या 'वहिनींच्या बांगड्या' (१९५३) चित्रपटावरून निघालेल्या 'भाभी की चुडिया' (१९६१) या चित्रपटाचा..यात दिग्गज अभिनेत्री मीना कुमारीने ती भूमिका लाजवाब साकारली होती! यातील लता मंगेशकारांनी गायलेले "ज्योति कलश छलके.." हे गाणे तर काळजाला भिड़ते! तसेच विशेष उल्लेख करायचा तो बाबुजींनी संगीत दिलेल्या 'पेहली तारीख़' (१९५४) चित्रपटाच्या किशोर कुमारने गायलेल्या शीर्षक गीताचा.. 'रेडिओ सीलोन' ला पूर्वी दर महिन्याच्या एक तारखेला ते हमखास लागायचे!
संगीतकार-गायक सुधीर फडके सपत्नीक!

सुमारे १०२ चित्रपटांस सुधीर फडके तथा बाबुजींनी संगीत दिले ज्यांत मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांचाही समावेश होता. त्यांनी संगीत दिलेल्या काही चित्रपटांस (पहिला 'प्रपंच'चा) राज्य पुरस्कार मिळाले, तर काहींना राष्ट्रीयही.. यांत राजा परांजपे यांचा 'हा माझा मार्ग एकला' (१९६१) होता! तर १९९१ मध्ये त्यांना 'संगीत नाटक अकादमी' चा सन्मानही प्राप्त झाला!

त्याच बरोबर गदिमांचे 'गीत रामायण' ही बाबुजींनी संगीतबद्ध करून घराघरांत पोहोचवले! तसेच गदिमांनी लिहिलेले सैनिकांसाठीचे मराठी स्फूर्तीगीतही त्यांनी संगीतबद्ध केले!

अखेरीस 'वीर सावरकर' चित्रपटाचा त्यांनी ध्यास घेतला होता..आणि (वारंवार दिग्दर्शक बदलून) वेद राही यांच्या कडून तो पूर्ण करून घेऊन २००१ मध्ये प्रदर्शित केला. याच्या पुण्यातील पत्रकार परिषदेस मी होतो!
बाबुजींच्या संगीतातील 'आधार' (१९६९) मध्ये "माझ्या रे प्रीती फुला." गाण्यात सुंदर अनुपमा!

तत्पूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेला शेवटचा मराठी चित्रपट होता 'रेशीम गाठी' (१९८८)..वर्षा उसगांवकर व अशोक शिंदे यांच्या भूमिका असलेल्या त्याच्या पुण्यातील प्रदर्शनानंतर पार्टी झाली होती आणि बाबूजी आवर्जून तिथे उपस्थित होते..भांडारकर रोड वरील हॉटेलच्या टेरेसवर तेंव्हा (चित्रपटावर चर्चा कमी होऊन) त्यांच्या संगीताची मैफलच पत्रकारांनी जमवली आणि मध्यरात्रीपर्यंत ती रंगली!

ते आठवून त्यांस आज ही सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment