Thursday, 19 July 2018

मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील सुंदर अभिनेत्री..उमा!


- मनोज कुलकर्णी


सुवर्णकाळातील रूपगुणसंपन्न मराठी अभिनेत्री ..उमा भेंडे!

"सुरावटीवर तुझ्या उमटती..
अचूक कशी रे माझी गझले!"

'मधुचंद्र' (१९६७) चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांच्या बरोबर उमा!

मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर साकार झालेले माझे एक सर्वांत आवडते प्रेमगीत!

'मधुचंद्र' (१९६७) या राजदत्त दिग्दर्शित चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांच्या बरोबर ते रोमांचक साकार केले होते..लोभसवाणे सौंदर्य असणाऱ्या उमा यांनी!

'थोरातांची कमळा' (१९६३) मध्ये सात्विक भूमिकेत उमा!
त्या गेल्याची बातमी ऐकल्यावर त्यांच्या अशा प्रणयी, त्याचबरोबर सात्विक नि सोज्वळ अविस्मरणीय भूमिका डोळ्यांसमोर तराळल्या होत्या..!
‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा' (१९७४) तील पारितोषिक विजेत्या भूमिकेत उमा!

कोल्हापूरच्या कलावंत साक्रीकर कुटुंबाची पार्श्वभूमी..आई-वडील फिल्म कंपन्यांतून ('प्रभात' व 'अत्रे पिक्चर्स') कामे करीत. तेंव्हा उमा यांनी कथ्थक व भरतनाट्यम नृत्याचे प्रशिक्षण लहानपणी घेतले..त्याच सुमारास बाबा भालजी पेंढारकरांच्या 'आकाशगंगा' (१९५९) चित्रपटात त्यांना लहान भूमिका मिळाली!

यानंतर १९६३ मध्ये माधवराव शिंदे यांच्या 'थोरातांची कमळा' या चित्रपटात त्या सर्वप्रथम नायिका झाल्या..बरोबर होते सूर्यकांत! मग 'स्वयंवर झाले सीतेचे' सारखे पौराणिक, 'शेवटचा मालुसरा' सारखे ऐतिहासिक व 'आम्ही जातो आमुच्या गावा' सारख्या सामाजिक..अशा गाजलेल्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका ह्या वैशिष्ठ्यपूर्ण होत्या. त्यांत ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा' (१९७४) तील भूमिकेसाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार मिळाला!

आपली निर्मिती असणाऱ्या 'भालू' (१९८०) मध्ये प्रकाश भेंडे यांच्या बरोबर उमा!
त्यांनी हिंदी चित्रपटांतूनही भूमिका रंगवल्या..यांत १९६४ मधील सत्येन बोस यांचा 'दोस्ती' आणि 'एक दिल और सौ अफसाने' हे विशेष उल्लेखनीय होत. त्यांनी छत्तीसगढी आणि तेलुगू चित्रपटांतूनही कामे केली!

‘नाते जडले दोन जिवांचे’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश भेंडे यांच्याशी त्यांचे जीवनाचे नाते जुळले! दोघांनी मग 'श्री प्रसाद चित्र' ही संस्था स्थापन करून १९८० च्या दशकात 'भालू', 'चटक चांदणी' व 'आई थोर तुझे उपकार' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली..ते रौप्यमहोत्सवी ठरले.

'मराठी चित्रपट महामंडळ' व राज्य सरकार तर्फे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले!

त्यांचा आज पहिला स्मृतिदिन!..त्यांना माझी ही सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment