Thursday, 17 September 2026


वंदन आमच्या थोर माते ला!


समर्पित कर्तव्यनिष्ठ जीवन सारे तुझे
कुटुंबावरी अनंत उपकार तुझे हे माते

बालपणापासून खडतर जीवन राहिले तुझे
त्यांतूनच शिक्षणाने उत्कर्ष साधलास तू माते

लहान वयातच झाले होते लग्न तुझे
एकत्र कुटुंबाचा भार वाहिलास तू माते

परिवाराची धार्मिक कार्ये करीत राहणे ते तुझे
व्रतस्थपणे सर्व जबाबदारी निभावलीस तू माते

निर्मळ, भावूक, हळवे असे मन तुझे
माया, करुणामय अशी वात्सल्यमूर्ती तू माते

कलासक्त राहून रसिकताही जोपासणे तुझे
कलागुणांना यातूनच प्रोत्साहन दिलेस तू माते

'आदर्श शिक्षिका' पर्यंत मोठे कार्य तुझे
सहृदय, संवेदनशील राहिलीस यांत तू माते

नातीगोती सांभाळीत सरबराई करणे असे तुझे
'सर्वांशी चांगले वागण्याचे'च सांगितलेस तू माते

अनेक कष्ट, दुःखे सोसणे ते तुझे
सर्वांसाठी जणू झिजत राहणे होते माते

दिव्यत्वाची प्रचितीच हे सारे जीवन तुझे
त्रिवार वंदन तुजला..आमची थोर माते

- मनोज

(माझी आई सरोज कुलकर्णी हिच्या स्मृतीस ही श्रद्धांजली!)