Saturday 25 August 2018

विनोदवीर..विजय चव्हाण.

अकाली एक्झिट!




विनोदी अभिनेता विजय चव्हाण यांच्या आकस्मित निधनाची बातमी चटका लावून गेली!

१९८५ च्या सुमारास आचार्य अत्रे यांच्या 'मोरुची मावशी' नाटकाने विजय चव्हाण प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मला आठवते त्यावेळी मी त्याची घेतलेली मुलाखत..जी तेंव्हा पुण्यातील 'मनोहर' साप्ताहिकात प्रसिद्ध झाली होती नि तो सुखावला होता! यात त्याने ती शिर्षक भूमिका साकारताना करावा लागणारा 'आटापिटा' कथन केला होता. "टांग टिंग टिंगा.." हे त्यातील गाजलेले गाणे संगीतबद्ध करणाऱ्या अशोक पत्की यांचेही ते पहिले हिट!
'मोरुची मावशी' नाटकातील त्या गाजलेल्या भूमिकेत विजय चव्हाण!




यानंतर 'आली लहर केला कहर' व 'वहिनीची माया' ने विजय चव्हाण चित्रपटात आला. त्यानंतर दादा कोंड़कें चा 'येऊ का घरात' (१९९२) असो वा महेश कोठारे चा लक्ष्मीकांत बेर्डे बरोबरील 'झपाटलेला' (१९९३) नाहीतर भरत जाधव बरोबरचा 'भरत आला परत' (२००७)..अशा विनोदवीरांबरोबर ही चित्रपटांतून त्याची अनोखी फार्सिकल 'जत्रा' रंगली. पुढे दूरचित्रवाणी मालिकांतूनही त्याने विविधरंगी भूमिका साकारल्या!

अलिकडेच राज्य शासनाचा 'व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार' स्वीकारल्यानंतर बोलताना प्रतिकुल (आरोग्य) परिस्थितीत ही आपली विनोद बुद्धी शाबूत असल्याचे त्याने दर्शवले; मात्र पुन्हा हसवण्याच्या भूमिकांत परतण्याचा त्याने व्यक्त केलेला आशावाद नियतीच्या चक्रात विरुन गेला!


त्यांस भावांजली!

- मनोज कुलकर्णी
 ('चित्रसृष्टी, पुणे)

No comments:

Post a Comment