Tuesday 21 August 2018

सर्वोत्कृष्ट चित्रपट..बाळबोध कथासूत्र नि व्यक्तिरेखांकन!


- मनोज कुलकर्णी


'उत्कृष्ट चित्रपटा'चा या वेळचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मराठी 'रेडू' चित्रपटास मिळाल्यानंतर, आसामी 'व्हिलेज रॉकस्टार' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा या वेळचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा तशीच निराशा झाली! 
याचे कारण दोन्हींचे बाळबोध कथासूत्र, व्यक्तिरेखांकन व सरधोपट हाताळणी!

मराठी 'रेडू' चित्रपटातील दृश्य!
'रेडू' चित्रपटातील अपवादात्मक तरल दृश्य!
आजच्या अत्याधुनिक युगात जिथे समाजाच्या (आर्थिकदृष्ट्या) खालच्या स्तरापर्यंतही टेलीविज़न पोहोचला आहे आणि इंटरनेट-मोबाईल सारख्या साधनांतून भरपूर करमणूक उपलब्ध झालीये..त्या काळात रेडीओ चे अप्रूप नि त्या भोवती गुंफलेली कथा कशी काय अपील होणार? अगदी १९७० दशकपूर्व काळ जरी 'रेड़ू' ने घेतला असला, तरी ट्रांजिस्टर साठी वेडापिसा होणारा माणूस हा खुळेपणा वाटतो. तसेच खाणीत काम करणारा हा माणूस घरीदारी तसाच मातकट कपड्यात वावरतो, विक्षिप्त हावभाव करतो आणि भोवतालची काही पण त्यांत अस्वाभाविक पणे येतांत..हे चित्र अगदी निरस वाटते! तसेच सामाजिक सलोख्याच्या उदात्त बिंदुवर चित्रपटाचा क्लायमॅक्स नेण्याचा प्रयत्न इथे दिसतो!..असा जर काही सामाजिक आशय चित्रकर्त्यांना मांडायचा होता, तर त्यासाठी अन्य कथावस्तु त्यांत घ्यायला हवी होती आणि स्वाभाविक व्यक्तिरेखांकन हवे होते! नाही म्हणायला (कोकण पार्श्वभूमीवर) छायाचित्रण तेवढे वेधक झालेय!

'इटालियन नववास्तववादा'चे प्रवर्तक व्हिट्टोरिओ डी सिका यांच्या 'बायसिकल थिवज' (१९४८) चित्रपटाचा संदर्भ इथे देणे उचित ठरेल. यात तत्कालिन आर्थिक-सामाजिक वास्तव मांडण्यासाठी सायकल कथावस्तु म्हणून केंद्रस्थानी होती; पण आजच्या मेट्रो युगातही तो भिडतो, कारण त्यातील कुटुंबप्रमुखाची ती सायकल हे उपजीविकेचे साधन होते आणि ती चोरीला गेल्यावर त्याचा माग घेतानाचा घटनाक्रम सर्व ज्वलंत वास्तव समोर आणतो. हे चित्र आज जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या समाजास सर्वकालीन अपील होणारेच! अर्थात या श्रेष्ठ चित्रकृतिशी तुलना होऊ शकत नाही; पण अशा प्रादेशिक चित्रपटांनी ह्याचे अवलोकन करावे! तसेच 'रेडू' ची हाताळणी काहीशी इराणी (किअरोस्तामी सारख्याच्या) चित्रपटाच्या अंगाने करण्याचा (असफल) प्रयत्न झाल्यासारखे वाटते; पण ती मर्मभेदी स्वाभाविकता त्यांस साध्य झालेली नाही!

आसामी 'व्हिलेज रॉकस्टार' चित्रपटातील दृश्य!
आसामी 'व्हिलेज रॉकस्टार'ची अवस्था अशीच सामान्य होती. त्याबाबत मी या वेळच्या राष्ट्रीय पुरस्कारां बाबत च्या माझ्या (इंग्रजी) लेखात लिहिले होते. गावातील साधारण परिस्थितीतील मुले आपला बॅन्ड काढू पाहतात हे त्याचे कथासूत्र होते..पण अर्ध्या भागातील त्यांचा वावर हा 'फ्रेंच न्यू वेव्ह' चे प्रवर्तक फ्रांस्वा त्रुफो यांच्या 'मिस्चिफ मेकर्स' (१९५७) या लघुपटातील उडाणटप्प्पू मुलांप्रमाणे (मात्र सरधोपट झालेला) वाटतो आणि खेळण्यातील वाद्ये घेऊन भरकटलेली ही पात्रे बेगडी वाटतात! हॅन्डी कॅमेराने केलेली ही हौशी फिल्म वाटते!

राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांत सर्वोत्कॄष्ट म्हणून निवडलेले असे चित्रपट पाहता, याबाबतच्या परीक्षक समितीच्या गुणवत्तेविषयी संदेह निर्माण होतो! त्यांत सुधारणा होण्याची गरज आहे. यामध्ये पुरस्कारप्राप्त चित्रपटकर्त्यांना नाउमेद करण्याचा हेतु नाही. पुढचे चित्रपट उत्तम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा!

- मनोज कुलकर्णी
['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment