Wednesday, 2 May 2018

शास्त्रीय व नाट्य संगीत यांतील खानदानी 
मराठी व्यक्तिमत्व..वसंतराव देशपांडे!
'खाँसाहेब' वसंतराव देशपांडेंना सलाम!

- मनोज कुलकर्णी

शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनात माहीर वसंतराव देशपांडे!

हिंदुस्थानी शास्त्रीय व नाट्य संगीत यांतील एक खानदानी मराठी व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव देशपांडे! त्यांची आज जयंती!

'अष्टविनायक' (१९७९) चित्रपटातील वसंतराव देशपांडे यांची  
(वंदना पंडितच्या) सहृदय वधुपित्याची भूमिका!


ग्वाल्हेर, किराणा, पतियाळा, भेंडीबाजार अशा विविध संगीत घराण्यांचे संस्कार होऊनही कोणत्याही घराण्याचा शिक्का वसंतराव देशपांडे यांनी लावून घेतला नाही; मात्र पं. दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचा त्यांच्यावर प्रभाव होता! तबला व हार्मोनियम सुद्धा ते उत्तम वाजवीत. शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनात ते माहीर होते. यांत प्रामुख्याने राग मारवा, मारू बिहाग, यमन आणि नाट्यभैरव गायन ही त्यांची खासियत होती!

लहान वयातच त्यांना रुपेरी पदड्यावर यायची संधी मिळाली..श्रेष्ठ चित्रकर्ते भालजी पेंढारकरांनी आपल्या 'कालियामर्दन' (१९३५) चित्रपटात त्यांना श्रीकृष्णाची भूमिका दिली! कालांतराने राम गबाले यांच्या 'दूध भात' (१९५२) चित्रपटातही त्यांनी काम केले..आणि पुढे (सचिन पिता) शरद पिळगावकरांच्या 'अष्टविनायक' (१९७९) मधील त्यांची (वंदना पंडित च्या) सहृदय वधुपित्याची भूमिका हृदयात घर करून गेली! यात "दाटून कंठ येतो.." हे त्यांनी सादर केलेले गाणे पाहताना डोळे पाणावले!

'कट्यार काळजात घुसली' नाटकात शानदार खाँसाहेबांच्या भूमिकेत वसंतराव देशपांडे!

तरीही वसंतराव देशपांडे आजही रसिकांच्या स्मरणात आहेत ते..१९६७ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या 'कट्यार काळजात घुसली' या नाटकात केलेल्या शानदार खाँसाहेबांच्या भूमिकेने! अल्पावधीत त्या संगीत नाटकाने तेव्हां सुमारे १००० प्रयोग केले होते. यात पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीतात "सुरत पिया की..", "तेजोनिधी.." व "ह्या भवनातील गीत पुराणे.." अशी त्यांनी खर्जात गायलेली गाणी काळजाला भिडली होती!

१९८२ मध्ये वसंतराव देशपांडे यांना 'संगीत नाटक अकादमी' चा पुरस्कार मिळाला!


योगायोग म्हणजे अलिकडे २०१५ मध्ये सुबोध भावे दिग्दर्शित 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटात त्यांची खाँसाहेबांची गाजलेली भूमिका सचिन पिळगावकरांनी केली..ज्यांच्या घरच्या निर्मितीतील 'अष्टविनायक' चित्रपटात वसंतरावांनी महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली होती!

आता त्यांचा नातू राहुल देशपांडे शास्त्रीय संगीत साधना करीत असून, 'कट्यार काळजात घुसली' मधील त्यांची गाजलेली भूमिका संगीतरंगभूमी वर करीत आहे..खाँसाहेबांची!

त्यांना विनम्र आदरांजली!!


- मनोज कुलकर्णी

['चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment