Wednesday, 18 March 2020

सहृदय नि भारदस्त कलाकार!


चरित्र अभिनेते..जयराम कुलकर्णी!


ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाल्याचे दुःखद वृत्त कळले..आणि माझ्या चित्रपट पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात झालेली त्यांची पहिली भेट आठवली!

ऐन विशितच माझे चित्रपट विषयक सदर एका वृत्तपत्रात सुरु झाले होते आणि पहिलेच परीक्षण लिहिले ते 'धूमधड़ाका' (१९८५) या तेंव्हाच्या मल्टीस्टारर मराठी चित्रपटाचे! अभिनेता महेश कोठारेचं ते पहिलंच दिग्दर्शन होतं. [श्रीधर यांच्या 'प्यार किये जा' (१९६६) या गाजलेल्या हिंदी चित्रपटावर तो आधारित होता.] त्यांत महेशच्या वडिलांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी केली होती. संस्कृतमध्ये संवाद साधणाऱ्या शिक्षकाची अशी आगळीवेगळी! मला आठवते तेंव्हा प्रीमियर नंतर पुण्यात डेक्कनवर 'पूनम' हॉटेलमध्ये त्यांच्यासह सर्व कलाकारांशी रंगलेली मैफल!

त्यानंतरही महेश कोठारेच्या चित्रपटांतून विशेष भूमिकांत ते दिसले. त्याचबरोबर सचिनच्या 'नवरी मिळे नवऱ्याला' (१९८४) अशा व किरण शांताराम निर्मित 'अशी ही बनवाबनवी' (१९८८) या गाजलेल्या चित्रपटांतही ते होते! जवळपास दीडएकशे चित्रपटांतुन त्यांनी विविधरंगी भूमिका केल्या. त्यांत पोलिस अधिकाऱ्याची भारदस्त भूमिका उल्लेखनीय!

नंतर चित्रपटांच्या कार्यक्रमांतून ते भेटले, कधी दूरध्वनिवरही बोलणे झाले! नवोदितांना ते करीत असलेले सहकार्य काही कार्यक्रमांतून पाहिले!

मराठी रंगभूमी, आकाशवाणी ते चित्रपट असा त्यांचा प्रदीर्घ अभिनय-कला प्रवास होता!

त्यांस भावपूर्ण श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Thursday, 27 February 2020


आज 'ज्ञानपीठ' प्राप्त सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व नाटककार वि. वा. शिरवाडकर यांची जयंती!

हा दिवस 'जागतिक मराठी दिन' म्हणुन साजरा केला जातो.

याप्रसंगी कुसुमाग्रजांना अभिवादन !!


- मनोज कुलकर्णी

Monday, 10 February 2020

'छपाक' पडद्यावर..मुश्किलीने आला 
स्त्रियांवर हे हल्ले रोखू नाही शकला! 

 दुःखद घटना!..नराधमांचा निषेध!!

Thursday, 19 December 2019

बुद्धिप्रामाण्यवादी नटश्रेष्ठ डॉ. लागू!

रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांतील मनस्वी कलावंत डॉ. श्रीराम लागू यांचे अखेर परवा वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले!

रंगभूमीवरचे 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू!
अभिनय क्षेत्रात रमलेल्या लागूंना वैद्यकीय पार्श्वभूमी होती आणि ते उत्तम सर्जन होते. एका वार्तालापात प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांनी 'पुण्यातील एका चित्रीकरणप्रसंगी दुखापत झाली असता आपल्यावर.. डॉ. लागूंनी उपचार केले होते!' असे सांगितल्याचे मला स्मरते!

वैद्यकीय क्षेत्राकडे पाठ फिरवून १९६९ मध्ये कानेटकरांच्या नाटकाद्वारे डॉ. लागूंनी अभिनय क्षेत्रात स्वतःला जणू झोकून दिले! जवळ जवळ अर्धशतक सुमारे २० नाटकांतुन आणि २५० हुन अधिक चित्रपटांतुन त्यांनी भूमिका केल्या. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती व इंग्रजी अशा भाषेच्या सीमा ओलांडत त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दर्शवली!
व्ही. शांताराम यांच्या 'पिंजरा' (१९७२) चित्रपटात निळु फुले, संध्या व डॉ. श्रीराम लागू!

रंगभूमीवर डॉ. लागूंनी तशा सर्वच भूमिका समरसून केल्या. त्यांत.. शिरवाडकरांचा 'नटसम्राट' आणि सॉक्रेटिस वरील 'सूर्य पाहिलेला माणूस' ह्या व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयातील उत्तुंगता सिद्ध करणाऱ्या ठरल्या!

१९७२ ला प्रदर्शित झालेल्या शांतारामबापूंच्या 'पिंजरा' ने डॉ. लागूंची चित्रपट कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली... 
'दी ब्ल्यू एंजल' (१९३०) या पहिल्या गाजलेल्या जर्मन बोलपटावर बेतलेल्या 'पिंजरा' मधील नर्तकी संध्या बरोबर त्यांची नैतिक अधःपतन होणाऱ्या मास्तराची भूमिका तशी आव्हानात्मक होती!
'सामना' (१९७४) चित्रपटांत डॉ. श्रीराम लागू व निळु फुले!


त्यानंतर 'सामना' (१९७४) आणि 'सिंहासन' (१९७९) या डॉ. जब्बार पटेलांच्या राजकीय थरारपट समजल्या गेलेल्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका ह्या लक्षवेधी होत्या. 
एकीकडे ग्रामीण राजकारणाची लक्तरं - काढणारा बेरकी मास्तर; तर दुसरीकडे - मुत्सद्दी मंत्री अशा परस्पर विरोधी भूमिका त्यांनी अनुक्रमे यांतुन बेमालूमपणे वठवल्या!

दरम्यान 'घरौंदा' सारख्या चित्रपटांतुन हिंदी मधुनही डॉ. लागू भूमिका करू लागले होते. प्रख्यात जपानी चित्रकर्ते अकिरा कुरोसवा यांच्या 'हाय अँड लो' (१९६३) या चित्रपटावर आधारित राज सिप्पीच्या 'इन्कार' (१९७७).. 
या बॉलीवुड रिमेक मधील त्यांची भूमिका.. उल्लेखनीय होती. नंतर राजेश खन्नाचा 'थोडी सी बेवफ़ाई' (१९८०) आणि अमिताभ बच्चनचा 'लावारिस' (१९८९) अशा आघाडीच्या नायकांबरोबरच्या चित्रपटांतून त्यांनी काम केले!

'देवकी नंदन गोपाला' (१९७७) चित्रपटात गाडगेबाबांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू!
बॉलीवुड प्रमाणेच कोलकत्यात ख्यातनाम दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या 'एक दिन... अचानक' (१९८९) मधील शबाना आझमी व अपर्णा सेन बरोबरील त्यांची भूमिका ही - उल्लेखनीय होती. तर रिचर्ड अटेनबरो यांच्या आंतरराष्ट्रीय 'गांधी' (१९८२) या 'ऑस्कर' प्राप्त चित्रपटात त्यांनी गोपालकृष्ण गोखले यांची - व्यक्तिरेखा साकारली होती!

'झाकोळ' (१९८०) या एकमेव चित्रपटाचे.. दिग्दर्शन लागूंनी केले. याद्वारे त्यांच्याबरोबर तनुजा यांनी हिंदीत काम केले; तर पुढे नावा - रूपास आलेल्या उर्मिला मातोंडकरने बाल - कलाकार म्हणून यातून पडद्यावर पदार्पण केले!

'देवकी नंदन गोपाला' (१९७७) या राजदत्त - दिग्दर्शित चित्रपटातील गाडगेबाबांची त्यांनी केलेली भूमिका ही त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत होती..हे मी त्यांच्याशी वार्तालापात नमूद केले होते..तेंव्हा त्यांनी त्यास दुजोरा दिला होता!

नाट्य व चित्रपट क्षेत्रांतील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले! अखेरच्या काळात आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतुन त्यांनी समाज प्रबोधनपर व्याख्यानेही दिली. तर 'लमाण' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले!

तरीही रंगमंचावर त्यांचे विलक्षण प्रेम होते..पण अखेर जीवनाच्या रंगभूमीवरून त्यांना एक्झिट घ्यावी लागली!

त्यांच्या स्मृतिस ही आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी

Saturday, 26 October 2019

वडिलांस भावपूर्ण श्रद्धांजली!!

आमचे वडिल लेखक श्रीविलास कुलकर्णी (वय ८१ वर्षे) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले!


'पुणे महानगरपालिके'तुन अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या आमच्या वडिलांचे लेखन क्षेत्रांतही योगदान होते. 
त्यांच्या साहित्य संपदेत अद्भुतरम्य साहस कथा आणि वैचारिक लेखनाचा समावेश होता. एकीकडे 'नीलमणी आणि पिवळा जादूगार', 'न हसणारी राजकन्या', 'गाणारा पक्षी', 'गुलसनोबर' सारख्या बालकथा; तर दुसरीकडे 'गौतम बुद्ध: जीवन आणि बोधकथा' व 'धर्म आणि राष्ट्रवाद' सारखी विचार मंथन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली!

'रहस्य रंजन', 'रम्यकथा', 'बुआ', 'महाराष्ट्र' व 'माणूस' सारख्या नियतकालिकांतुन त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर 'सुदर्शन' मासिक' व 'सा. अखंड भारत' यांच्या संपादकीय विभागांत त्यांनी कामही केले होते. 
तर 'मेघदूत' या एकेकाळच्या लोकप्रिय मासिकाचे ते संपादक होते!

'पुणे महानगरपालिके'च्या 'नागरी जीवन' या नियतकालिकास त्यांचे संपादन सहाय्य असे. सेवानिवृत्ति नंतर अलिकडेच त्यांची 'माझी मुक्तफुले' हा गद्य-काव्य संग्रह आणि 'बालोद्यान' ही पुस्तके प्रकाशित झाली होती.

माझ्या चित्रपट पत्रकारितेस त्यांचे प्रोत्साहन होते!

त्यांच्या आत्म्यास शांती मिळो!!

- मनोज कुलकर्णी

Thursday, 17 October 2019

'काँग्रेस'च्या विचारसरणीशी एकनिष्ठ नि समाज कार्यास सदैव तत्पर.. सोलापुरच्या लोकप्रिय आमदार.. 

प्रणिती शिंदे यांस विजयासाठी.. 

हार्दिक शुभेच्छा! 

- मनोज कुलकर्णी

Friday, 27 September 2019

'सिंहासन' नंतर राजकीय थरारपट होण्यासारखी सद्यस्थिती!
'गाभ्रीचा पाऊस' असाही!

Saturday, 31 August 2019

मुबारकबाद!


'चतुरंग प्रतिष्ठान' चा 'सामाजिक जीवन गौरव' पुरस्कार 'मुस्लिम सत्यशोधक समाजा' चे श्री. सय्यदभाई यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

- मनोज कुलकर्णी

Friday, 30 August 2019

"प्रेम असता साथीला..
मार्ग सुकर ध्येयाचा!"


'मराठी बिग बॉस-२' च्या अंतिम फेरीत एकमेकांचा हात धरून पोहोचलेल्या ह्या प्रेमी युगुला कडे पाहून वरील ओळी सुचल्या!

शिवीना(णा)..शुभेच्छा !!

- मनोज कुलकर्णी

Friday, 26 July 2019

सहकार अग्रणी व स्मिता पिता!


स्मिता पाटीलने माता-पिता यांच्यासह साजऱ्या केलेल्या (अखेरच्या) वाढदिवस प्रसंगी शिवाजीराव पाटील!

सहकार क्षेत्रातील अग्रणी, माजी खासदार, राज्यमंत्री 
आणि दिवंगत प्रतिभाशाली अभिनेत्री स्मिता पाटीलचे वडील श्री. शिवाजीराव पाटील यांचा दुसरा स्मृतिदिन अलिकडेच होऊन गेला!

ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि साखर कारखान्यांच्या सहकार क्षेत्रात अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते!

'पिफ्फ' मध्ये शिवाजीराव पाटील यांस माझा भेटण्याचा क्षण!

दोन वर्षांपूर्वी 'पिफ्फ' मध्ये स्मिता पाटीलच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या दृकश्राव्य कार्यक्रमास शिवाजीराव पाटील यांची खास उपस्थिती होती. त्यावेळी तिचे धीरगंभीर अभिनय आविष्कार पाहताना त्यांचे डोळे पाणावले होते..!

तो संक्रांतीचा दिवस असल्याने तिळगुळ घेऊन त्यांस नमस्कार केला आणि माझा 'चित्रसृष्टी' नववास्तववादी चित्रपट विशेषांक त्यांस भेट दिला..त्याचे त्यांनी कौतुक केले!

ती भेट शेवटची ठरली!..त्यांस विनम्र आदरांजली!!


- मनोज कुलकर्णी

Thursday, 11 July 2019

तेंडुलकर परंपरेची अखेर!


मंगेश तेंडुलकर यांचे पुस्तक.
प्रख्यात व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या कुंचल्याने अखेर कायमची विश्रांती घेतली..त्यास आता दोन वर्षे लोटली!

लेखक विजय तेंडुलकर.
सामाजिक-राजकीय घडामोडींवर चित्रभाष्य करणारे मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांतून उपहास सहजसुंदर व्यक्त होई. त्याचबरोबरच 
ते मार्मिक लेखनही करीत. तसेच नाटक हा सुद्धा त्यांचा आवडीचा विषय असल्याने त्याची विविधांगी समीक्षा करीत!

'संडे मूड' हा त्यांचा (व्यंगचित्रांसह) लेखसंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांना 'महाराष्ट्र साहित्य परिषदे' चा 'चि. वि. जोशी पुरस्कार' मिळाला!

संवेदनशील अभिनेत्री प्रिया तेंडुलकर!

त्यांच्या जाण्याने तेंडुलकर परंपरेची अखेर झाली आहे असे मला वाटते. काही वर्षांपूर्वी त्यांचे बंधु व परखड लेखक-पटकथाकार विजय तेंडुलकर गेले आणि ('रजनी' प्रसिद्ध) संवेदनशील अभिनेत्री पुतणी प्रिया तेंडुलकरही हुरहूर लावून गेली! 

या तिघांसही वेगवेगळ्या प्रसंगी नि कार्यक्रमांतून भेटण्याचा व बोलण्याचा 
योग मला आला आणि त्यांतून त्यांचे प्रागतिक विचारही जाणून घेता आले!

मंगेश तेंडुलकरजींस माझी विनम्र श्रद्धांजली!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday, 10 July 2019

भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे!


माझ्या अलिकडच्या लिखाणावरून मी मराठी भाषा व त्यातील प्रादेशिक चित्रपट द्वेष्टा असल्याचा गैरसमज करून 
घेऊ नये! (वास्तविक माझी आजवरची पत्रकारिता ही प्रामुख्याने मराठीतच झाली आहे आणि मराठी चित्रपटावर मी भरपूर लिखाण केले आहे)..मराठी सिनेमा वृद्धीसाठी वारंवार माझी लेखणी झुरलीये!

फक्त संकुचित मनोवृत्तीने आपल्याच भाषा-चित्रपटाचे अवडंबर माजवणे मला योग्य वाटत नाही..आणि याविषयीची सक्ती व बोलणे-कृतीतील विरोधाभास खटकतो! त्याच्या गुण-दोषांवर टीका-टिपणी व्हायला हवी.!

सर्व भाषा आणि त्यांतील कला नि चित्रपट यांचे वैश्विक स्तरावर व्यापक अवलोकन व्हावे..आणि कुठल्या भाषेत कुणाला कसे व्यक्त व्हावे वाटते याचे सर्वंकष अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे हीच इच्छा!

- मनोज कुलकर्णी