Sunday 30 December 2018

"..स्मृती ठेवुनी जाती.."

कवि-गीतकार मंगेश पाडगावकर!
मराठीतील अत्यंत लोकप्रिय कवि आणि गीतकार मंगेश पाडगावकर हे जग सोडून गेल्याला आता तीन वर्षें झाली! त्यांच्या आठवणीत शिर्षक ओळ मनात रुंजी घालते!
मंगेश पाडगावकरांची काव्यसंपदा त्यांच्याकडून ऐकणे हा अनोखा अनुभव असे!

'आनंदऋतू', 'गझल' ते 'जिप्सी', 'बोलगाणी' 
असे ४० च्या आसपास काव्यसंग्रह आणि.. 
मराठी चित्रपटांसाठी मंगेश पाडगावकरांनी 
गीते लिहिली.

पाडगावकरांची काव्यसंपदा पाहता ते नेहमी काळाबरोबर राहिलेले आणि त्यानुसार कायम नाविन्यपूर्ण लिहिणारे असे कालातीत कवि वाटतात! तसेच सर्व (युवासह) पिढींना भावणारे त्यांचे काव्य नवा बहर घेऊन आल्याचे जाणवते! 

म्हणूनच "लाजून हासणे.." लिहिणारे पाडगावकर कालांतराने लिहून गेले "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.." यात 'मराठीतून "इश्श" म्हणून प्रेम करता येतं आणि उर्दूमधून "इश्क" म्हणूनही प्रेम करता येतं' अशी भाषातीत प्रेमाची अनुभूती ते देतात! अर्थात "शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.." हेही त्यांनी लिहिलेय!
कवि मंगेश पाडगावकर..तत्कालिन राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जीं कडून 'पद्मभूषण' पुरस्कार स्वीकारताना!


"शब्द शब्द जपून ठेव.." अशी काव्यरचना करणाऱ्या मंगेश पाडगावकरांना.. 'साहित्य अकादमी' पुरस्कारा बरोबरच 'महाराष्ट्र भूषण' व 'पद्मभूषण' पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. 'विश्व मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले!

"शुक्र तारा मंद वारा.." हे अरुण दातेंनी गायलेलं आणि "माझे जीवन गाणे.." हे पं. जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं अशी पाडगावकरांची गीते मनात रुंजी घालतात!

मात्र ते "या जन्मावर..या जगण्यावर शतदा प्रेम करावे." असे सांगून आपल्यातून निघून गेलेत!
त्यांना ही विनम्र भावांजली!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment