Saturday 24 November 2018

गर्दिश में तारें रहेंगे सदा..! 

- मनोज कुलकर्णी


'आर.के.स्टुडिओ' कपूर परिवार विकणार असल्याची बातमी या वेळी धक्का देऊन गेली!..मागच्या वर्षीच तिथे आगीची दुर्घटना घडली होती..आणि त्यांच्या अभिजात चित्रपटांच्या वस्तु स्वरुपात असणाऱ्या गोष्टी त्यांत नष्ट झाल्या असतील याने हळहळ वाटली! त्याचबरोबर 'आर.के.' च्या संगीतप्रधान प्रणयपटांची दृश्ये स्मृतिपटलावर तरळली!

आपल्या चित्रकृतींचे वैशिष्ट्य राज कपूर ने 'आर.के. फिल्म्स' च्या प्रतिका मध्ये खूबीने दर्शविले होते..जे त्याच्या पहिल्या हिट 'बरसात' चित्रपटातील दृश्यावरून घेतले होते..ज्यात राज कपूर च्या एका हातात झुलणारी नर्गिस आणि दुसऱ्या हातात व्हायोलिन होते..म्हणजे प्रणय आणि संगीत ही 'आर.के.' च्या चित्रपटाची ओळख! 'आर.के. स्टुडिओ' च्या प्रवेशद्वाराजवळ हे कायम दीमाखत उभे राहिले!

राज कपूरची पडद्यावरील 'आग' (१९४८) अखेर स्टुडिओपर्यंत आली!
देश स्वतंत्र झाल्यानंतर..१९४८ मध्ये राज कपूर ने मुंबईत चेंबूर येथे 'आर.के. स्टुडिओ 'ची स्थापना केली आणि पहिला चित्रपट केला.. 'आग'! (अजब योगायोग म्हणजे सुमारे सात दशकांनंतर स्टुडिओ सिस्टिम चा अस्त झाल्यावर त्यास प्रत्यक्षात ती लागणें!)
तर ती पहिली 'आग' लगेच विझली..म्हणजेच 'आर.के.' चा तो पहिला चित्रपट चालला नाही! यांत कामिनी कौशल आणि नर्गिस बरोबर राज कपूर ने रंगभूमीशी समर्पित भूमिका वठवली होती!
'आर.के. फिल्म्स' चे प्रतिक झालेले 'बरसात' (१९४९) चे राज कपूर च्या 
एका हातात झुलणारी नर्गिस आणि दुसऱ्या हातात व्हायोलिन हे दृश्य!

१९४९ मध्ये 'आर.के.' ने संगीत नि प्रेम यांवर आपला 'बरसात' हा यशस्वी चित्रपट निर्माण केला..याची कथा लिहिली होती..(प्रसिद्ध चित्रपटकर्ते) रामानंद सागर यांनी! इथूनच 'आर.के.' ला संगीत साथी मिळाले.. गीतकार शैलेन्द्र, हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर-जयकिशन..अन त्याचा आवाज मुकेश! त्याचबरोबर यातील "मुझे किसीसे प्यार हो गया.." सारखी गाणी गाणारी लता मंगेशकर!


चेंबूर येथे अंदाजे दोन एकर जागेत 'आर.के. स्टुडिओ'ची उभारणी झाली होती आणि १९५० मध्ये तेथील मुख्य इमारतीचे बांधकाम झाले..या मागेच राज कपूरची कॉटेज होती आणि तिथे तो चित्रपट निर्मिती संदर्भात बैठका घेत असे! (नर्गिस ची ड्रेसिंग रूम ही तिथेच होती!) तसेच या परिसरात विविध समारंभ आयोजिले जाऊ लागले..जसा स्टुडिओचा गणेशोत्सव आणि 'आर.के' च्या प्रसिद्ध होळीचे रंगही इथेच खेळले जाऊ लागले!

खरं तर 'भारतीय सिनेमा चा चार्ली चॅप्लिन' ही ओळख होती अभिनेता राज कपूर ची पडद्यावर..जी त्याने आपल्या 'आवारा' (१९५१) चित्रपटात 'चार्ली ट्रॅम्प' वर चालत राखली! तर त्याचा आवाज बनलेल्या मुकेश ने गायलेले याचे शिर्षक गीत रशियापर्यंत निनादत राहिले आणि राज कपूर तिथे फेमस झाला! यातही नर्गिस ही राज कपूर ची नायिका होती..बिघडलेल्या आवारास प्रेमाने सुधारणारी तिची सुंदर भूमिका यात होती! यातले स्वप्नदृश्य भारतीय चित्रपट इतिहासात प्रसिद्ध आहे..यात नर्गिस (प्रेम) अप्सरा रुपात स्वर्गातून खाली येते आणि राज कपूर तिच्या पायाशी आक्रोश करतो "ये नहीं हैं, ये नहीं हैं जिंदगी..मुझको चाहीए बहार.."
'आवारा' (१९५१) चित्रपटातील  स्वप्नदृश्यात राज कपूर व नर्गिस!

राज कपूर आणि नर्गिस असे सुमारे १५ चित्रपटांतून एकत्र नायक-नायिका म्हणून आले. याचे कारण दर्शकांना भावलेला त्यांच्यातील उत्कट भावाविष्कार! एकत्र काम करण्याबरोबरच राज कपूरने नर्गिस बरोबर जगभर फिरून आपल्या 'आर.के. स्टुडिओ' च्या चित्रपटांचा प्रसार केला. यांमध्ये साम्यवादाच्या पार्श्वभूमीवरील गरीब नायकाच्या प्रतिमेने त्याचे चित्रपट सोविएत/राशियात अधिक लोकप्रिय झाले!..नर्गिस ने मात्र 'श्री ४२०' व 'जागते रहो' नंतर 'आर.के. फिल्म्स' मध्ये काम केले नाही!

'श्री ४२०' मध्ये 'चार्ली स्टाईल' राज कपूर!
दरम्यान 'इटालियन नव-वास्तववाद' ने प्रेरित होऊन 'आर.के.' चे दोन चित्रपट बनले; पण त्यांचे दिग्दर्शन दुसऱ्यांनी केले..ज्यामध्ये (डी सिकां च्या चित्रपटांतून स्फूर्ती घेऊन निर्माण केलेले) 'बूट पॉलिश' (१९५४) प्रकाश अरोरा ने आणि 'जागते रहो' (१९५६) शंभु मित्रा ने दिग्दर्शित केले! यांचे वास्तववादी चित्रीकरण करणाऱ्या राधु कर्माकरने 'आर.के.' च्या शेवटच्या चित्रपटापर्यंत त्यांची सिनेमॅटोग्राफी केली. यांत विशेषत्वाने नमूद करायचे म्हणजे 'आर.के.' निर्मित 'जिस देश में गंगा बहती हैं' (१९६०) चे दिग्दर्शन कर्माकरने केले! आणि यात राज कपूर बरोबर नर्गिस च्या जागी दाक्षिणात्य अभिनेत्री पद्मिनी आली!
'जिस देश में गंगा बहती हैं' (१९६०) त राज कपूर!

१९६४ मध्ये 'आर.के.' ने पहिला रंगीत चित्रपट केला 'संगम'..जो मेहबूब खान यांच्या अभिजात 'अंदाज़' (१९४९) चा (प्रेमी त्रिकोण) प्लॉट घेऊन आला..आणि 'मेहबूब स्टुडिओ' बरोबरच त्याने हा निर्माण केला होता! यात वैजयंतीमाला आणि राजेंद्र कुमार बरोबर राज कपूर ने मूळ भूमिकाच परत केली होती! याचे चित्रीकरण त्याने विदेशातही केले. इथूनच स्वित्झर्लंड सारख्या फॉरेन लोकेशन वर हिंदी चित्रपटांच्या गाण्यांचे चित्रीकरण करणे सुरु झाले!
'संगम' (१९६४) मध्ये राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्र कुमार!

यानंतर नायक म्हणून राज कपूर चा 'मेरा नाम जोकर' (१९७०) अपयशी ठरला! सर्कसमधील जोकरच्या रूपकातून त्याने हास्य कलाकाराची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. के.ए. अब्बास यांनी याचे पटकथा लेखन केले होते. यांत त्याच्या बरोबर पद्मिनी, सिम्मी गरेवाल आणि सुंदर सोवियत/रशियन कलाकार क्सेनिया रॅबिनकिना होती! या चित्रपटाच्या लांबीमुळे त्यावेळी दोन मध्यान्तरे ठेवण्यात आली होती.

'कल आज और कल' (१९७१) मध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर व रणधीर कपूर!
मग तिन पिढ्यांतील संघर्ष दर्शवणाऱ्या 'कल आज और कल' (१९७१) मध्ये पिता पृथ्वीराज कपूर आणि नायक बनलेला पुत्र रणधीर कपूर यांबरोबर प्रौढ़ भूमिकेत राज कपूर पडद्यावर आला! याचे दिग्दर्शनही रणधीरने केले होते आणि यात त्याच्या बरोबर त्याची पत्नी बबीता होती! यापूर्वी 'आवारा' मध्ये पृथ्वीराज कपूर यांनी राज च्या पित्याची भूमिका केली होती. तसे नंतर ते 'आर. के.' च्या प्रत्येक चित्रपटात (श्रेयनामावली आधी) सुरुवातीला पूजा करताना दिसले!


'बॉबी' (१९७३) मध्ये ऋषि कपूर आणि षोडश सुंदर डिंपल कपाडिया!
१९७३ मध्ये राज कपूर ने आपला दुसरा मुलगा ऋषि कपूर आणि षोडश सुंदर डिंपल कपाडिया ला घेऊन 'बॉबी' हे युवा प्रेमाचे उत्कट चित्र सादर केले आणि हा चित्रपट सुपरहिट झाला! इथे लक्ष्मीकांत-प्यारेलाल संगीतकार म्हणून 'आर.के. फिल्म्स' मध्ये आले आणि शैलेन्द्र सिंग सारख्या नवख्याने गायलेली आनंद बक्षी ची "मै शायर तो नहीं, मगर ए हसीं..जबसे देखा मैंने तुझको.." अशी यातील रूमानी गाणी हिट झाली!

'बॉबी' चे काही चित्रीकरण पुण्यात आणि लोणी येथे झाले. तसे राज कपूर च्या बहुतेक चित्रपटांचे काही चित्रीकरण या भागांत झालेय!
'सत्यम शिवम् सुंदरम' (१९७८) मध्ये शशी कपूर आणि झीनत अमान!

यानंतर 'आर.के' ने काही संवेदनशील नि सामाजिक विषयांवर चित्रपट बनवले.. ज्यांचे लेखन जैनेन्द्र जैन ने केले होते. यांत 'सत्यम शिवम् सुंदरम' (१९७८) हा शारीरिक सुंदरतेच्या पलीकडे जाऊन कलेची सुंदरता पारखणारा होता आणि यात राज बंधु शशी कपूर बरोबर झीनत अमान ने आव्हानात्मक भूमिका उत्तम साकारली होती!

तर 'आर.के.' चा पुढचा 'प्रेमरोग' (१९८२) हा विधवेशी प्रेम नि विवाह असा नाजुक धागा घेऊन आला होता  आणि यात ऋषि कपूर बरोबर पद्मिनी कोल्हापुरे ने ती विधवा कुमारिका समजुन-उमजुन संयतपणे साकारली होती! या चित्रपटांचे चित्रीकरणही लोणी तील राजबागेत झाले होते!
'राम तेरी गंगा मैली' (१९८५) मध्ये राजीव कपूर आणि मंदाकिनी!

मग आपल्या तिसऱ्या मुलास राजीव कपूर ला नायक बनविणारा 'राम तेरी गंगा मैली' (१९८५) हा शेवटचा चित्रपट राज कपूर ने निर्माण केला..इथे ही गंगा रूपक म्हणून वापरण्यात आली होती आणि त्याद्वारे समाजातील निराधार 
(कुमारी माता) स्त्रीचे 
शोषण दाखविण्यात आले! यात मंदाकिनी (मूळ यास्मिन) ने ती व्यक्तिरेखा संवेदनशीलपणे साकारली! 
या यशस्वी चित्रपटातील रविंद्र जैन यांची अर्थपूर्ण गाणी गाजली!

'आर. के.' च्या चित्रपटांस अनेक पुरस्कार मिळाले..यांत ३ राष्ट्रीय सन्मान आणि ११ फ़िल्मफ़ेअर अवॉर्ड्स यांचा समावेश होतो. त्याचबरोबर 'कान्स' सारख्या चित्रपट महोत्सवांतून गौरविले गेले..तर 'जागते रहो' चित्रपटास प्रतिष्ठेच्या 'कार्लोवी वेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'त 'क्रिस्टल ग्लोब' अवॉर्ड मिळाले! याच बरोबर भारत सरकारने राज कपूरला १९७१ मध्ये 'पद्मभूषण' आणि १९८७ मध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने गौरविले!
'हीना' (१९९१) मध्ये ऋषि कपूर आणि (पाकिस्तानी) सुंदर झेबा बख़्तियार!

मला आठवतंय 'आर. के. स्टुडिओ' मध्ये माझे १९८९-९० दरम्यान जाणे..त्या सुमारास तिथे बाहेरील चित्रपटांचेही चित्रीकरण होऊ लागले होते..एकदा तिथे स्पेशल इफेक्टस साठी ख्याती असलेले बाबुभाई मिस्त्री दिग्दर्शित 'हातिमताई और सात सवाल' (१९९०) या पोषाखी-जादुई चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते..जितेंद्र, संगीता बिजलानी आणि सतीश शाह यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या..ते पाहून त्यांच्याशी बोलल्यावर मी स्टुडिओ मध्ये फेरफटका मारला..तेंव्हा 'आर. के. फिल्म्स' च्या अनेक स्मृति वस्तुरूपांत ठिकठिकाणी आढळल्या..यांत 'आर. के.' च्या सर्व चित्रपटांची पोस्टर्स मुख्य इमारतीत सर्वत्र लावलेली, 'आवारा' चे स्वप्नदृश्य चित्रित झालेले सेट्स, राज-नर्गिस च्या 'श्री ४२०' मधील प्रसिद्ध "प्यार हुआ इकरार हुआ हैं.." गाण्यात वापरलेली मोठी काळी छत्री आणि 'बॉबी' ची मोटरसायकल पण होती!
'आ अब लौट चले' (१९९९) मध्ये अक्षय खन्ना व ऐश्वर्या राय!

राज कपूर च्या निधनानंतर त्यांच्या महत्वाकांक्षी 'हीना' (१९९१) चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा मोठा मुलगा रणधीर कपूर ने केले. के.ए. अब्बास यांनी लिहिलेली ही भारत-पाकिस्तान च्या पार्श्वभूमीवरील तरल प्रेम कहाणी होती. यांत दुसरा मुलगा ऋषि कपूर नायक होता; तर पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख़्तियार ने शिर्षक भूमिका लाजवाब साकारली! 

नंतर तिसरा मुलगा राजीव कपूर ने 'प्रेम ग्रंथ' (१९९६) दिग्दर्शित केला..ज्यात ऋषि कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या भूमिका होत्या. त्यानंतर नव्या पिढीचा नायक अक्षय खन्नास ऐश्वर्या राय बरोबर पेश करीत ऋषि कपूर ने दिग्दर्शनात पाउल टाकले ते 'आ अब लौट चले' (१९९९) द्वारे! पण हे दोन्ही चित्रपट फारशी चमक दाखवू शकले नाहीत!
कपूर नवी पीढ़ी..करीना कपूर, रणबीर कपूर आणि करिश्मा कपूर!

अशी या 'शोमन आर. के.' ची मुले 'आर. के. स्टुडिओ' ची जबाबदारी पार पाडत असताना..गेल्या वर्षी आगीचा हादसा झाला..आणि त्यांतून सावरून ते चित्रपट निर्मितीची परंपरा चालू ठेवतील असे वाटत असतानाच..'आर.के.स्टुडिओ' ते विकणार असल्याची धक्कादायक बातमी येऊन गेली!
'मेरा नाम जोकर' (१९७०) मध्ये राज कपूर!

अजूनही आशा ठेवूया की 'आर.के.' च्या नव्या पिढीचे (रणबीर कपूर सारखे) यांतून काही चांगला मार्ग काढतील!..नाहीतर अस्तास जाताना स्टुडिओ म्हणेल..

"कल खेल में हम हो न हो..गर्दिश में तारें रहेंगे सदा.."
 भुलेंगे तुम भूलेंगे वो..पर हम तुम्हारे रहेंगे सदा...!"

- मनोज कुलकर्णी
   ['चित्रसृष्टी']

No comments:

Post a Comment