Tuesday 4 October 2022

'सहेला रे'..स्त्रीची स्वत्वासाठी चित्रपटीय हाक!

"सहेला रे.." हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अग्रणी किशोरी आमोणकर यांनी राग भोपालीत गायलेले गीत कानात रुंजी घालू लागते! तसेच मृणाल पांडे लिखित संगीतविषयक हिंदी साहित्यकृती 'सहेला रे' ही स्मरते! निमित्त, आता मृणाल कुलकर्णी यांच्या मराठी चित्रपटाचे शीर्षक..'सहेला रे'!

व्यवसायात व्यस्त पती मुळे काहीसा मानसिक कोंडमारा झालेल्या स्त्री ला रियुनियन (माजी - विद्यार्थ्यांच्या मेळाव्या) च्या निमित्ताने अचानक जिंदादिल वर्गमित्र भेटतो, त्याचे अव्यक्त प्रेम उमजते आणि अल्प काळासाठी का होईना ती तिचं प्रफुल्लित जिणं मनसोक्त अनुभवतें, त्याचबरोबर स्वत्व साध्य करते! हे कथासूत्र असणाऱ्या ह्या चित्रपटात सुबोध भावे व सुमित राघवन यांनी अनुक्रमे पती व मित्र ह्या दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्तिरेखा त्याच आविर्भावात रंगवल्यात आणि त्यांच्यासमवेत मृणाल कुलकर्णी यांनीच हे स्त्री जीवननाट्य पडद्यावर कधी संयत तर कधी अत्युत्कटतेनं रंगवलंय!

छायाचित्रण उल्लेखनीय आहे. त्यांत काही तीव्र भावनिक प्रसंगांचे चित्रीकरण व त्यातील सेटिंग-लाइटिंग हे हाँगकाँग चे चित्रकर्ते वॊन्ग कर-वाई 
('इन दी मूड फॉर लव्ह'/२००० फेम) यांच्या धाटणीचे वाटते! संबंधित तंत्रज्ञांवर त्यांचा प्रभाव असावा! यातले "सई बाई गं.." गीत चित्रपटाचा आशय घेऊन येते!

या विषयावर वेगवेगळ्या स्वरूपात आधी काही चित्रपट येऊन गेलेत. २०१८ मधील रियुनियन वरचा तामिळ 'नाईन्टी सिक्स' हा या संदर्भात कुणाला आठवला तर नवल नाही! अर्थात 'सहेला रे' हा काही भावनिक नि हलक्याफुलक्या रीतीने संतुलित पटकथेद्वारे चौकटीत हा विषय मांडतो! मात्र काही प्रसंग रचना विनोदासाठी केलेली वाटते. कार्यक्रमातील काव्यवाचन वा किल्ल्यावरच्या मस्तीत मुलांची शेरो-शायरी! इथे अभिरुची राखता आली असती! काही आरोळीवजा (खटकणारे) संवाद सोडता, करमणुकीच्या परिघातच हे चित्रपटीय भाष्य होते!

या क्षणी मला टागोरांच्या अभिजात बंगाली कादंबरी वरील श्रेष्ठ चित्रकर्ते सत्यजित राय यांची 'चारुलता' (१९६४) ही चित्रकृती आठवते. पतीच्या व्यस्ततेमुळे एकाकी जीवन कंठणाऱ्या कला-काव्य रसिक घरंदाज स्त्रीचे जीवन कलासक्त तरुणाच्या येण्याने बदलते असा याचा कथा आशय. अर्थात या कथेस अन्यही कंगोरे होते!

असो, 'प्लॅनेट मराठी' ची 'सहेला रे' ही चित्रपट निर्मिती स्त्रीची स्वत्वासाठी एक हाक म्हणता येईल! मात्र मधेमधे येणारा अनाठायी ह्यूमर (काहीसा खट्याळ) टाळला असता व प्रमुख व्यक्तिरेखांचे भावविश्व अधिक उत्कट (रोमँटिक) करण्या वर भर दिला असता, तर हे तरल भावोत्कट चित्रकाव्य होऊ शकले असते!!


- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment