Monday 10 January 2022

मराठी चित्रपट नव्वदीत!

'अयोध्येचा राजा' (१९३२) यात निंबाळकर, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे दिगंबर!

१९३२ साली प्रदर्शित झालेला पहिला मराठी बोलपट 'अयोध्येचा राजा' हा आता आपली ९० वर्षे पूर्ण करीत आहे.

गौरवशाली 'प्रभात फिल्म कंपनी' निर्मित ह्या बोलपटाचे दिग्दर्शन व संकलन व्ही. शांताराम यांनी केले होते..आणि ध्वनिमुद्रणाचे महत्कार्य यशस्वी करून विष्णुपंत दामले यांनी यांत मोलाचे योगदान दिले होते!

'प्रभात' चे विष्णुपंत दामले!
दादासाहेब फाळकेंनी निर्मिलेल्या 'राजा हरिश्चंद्र' (१९१३) ह्या आपल्या पहिल्या भारतीय चित्रपटाचेच कथानक असलेल्या..'अयोध्येचा राजा' बोलपटाची पटकथा एन.व्ही.कुलकर्णी यांनी लिहिली होती. तर शेख फत्तेलाल यांचे यात कलादिग्दर्शन होते आणि छायाचित्रकार केशवराव धायबर यांनी याचे चित्रीकरण केले होते.

रंगभूमीवरील प्रख्यात गायक-अभिनेते गोविंदराव टेंबे यांनी यात हरिश्चंद्राची प्रमुख भूमिका रंगवली होती आणि संगीतही दिले होते. त्यांच्यासमवेत दुर्गा खोटे ह्या तारामतीच्या भूमिकेत पडद्यावर आल्या, तर रोहिताश्व साकारला होता दिगंबर यांनी!..आणि विश्वामित्र झाले होते निंबाळकर!

हा बोलपट त्याच वर्षी हिंदीत सुद्धा 'अयोध्या का राजा' या नावाने बनला गेला आणि त्यांचे संवाद लेखन मुन्शी इस्माईल यांनी केले होते!

मागे काही अतिउत्साहींनी ('राजा हरिश्चंद्र' मूकपटापासून धरत) मराठी चित्रपटाची शंभरी कार्यक्रम/पुस्तक द्वारे साजरी केली होती. त्यांत तथ्य नव्हते. असो!!

तर आता कुठे ९० वर्षांचा होत असलेल्या आपल्या ह्या मराठी बोलपटास ही मानवंदना!!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment