Friday 21 January 2022

 मराठी चित्रपट सृष्टीचा आधारवड!

 'पुणे गेस्ट हाऊस' चे कै. चारुदत्त सरपोतदार!

मराठी चित्रपट-नाट्य वर्तुळात जिव्हाळ्याने "चारुकाका" संबोधले गेलेले चारुदत्त सरपोतदार यांस जाऊन आता ४ वर्षे होऊन गेली!

'जावई माझा भला' (१९६३) चित्रपटाचे पोस्टर!
त्यांच्या जाण्याने त्या पिढीचा या क्षेत्राशी समर्पित दुवा हरपला! वेगवेगळ्या कारणां निमित्त त्यांच्या झालेल्या भेटी व मराठी चित्रपट इतिहासावरील चर्चा मला आठवल्या!


त्यांचे वडील नानासाहेब सरपोतदार हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या प्रवर्तकां पैकी एक होते! त्यांची परंपरा बंधु विश्वास तथा बाळासाहेब सरपोतदार आणि गजानन - सरपोतदार यांच्या बरोबरच त्यांनीही काही वर्षे चालवली. 'रंगल्या रात्री अशा' (१९६२) सह 'जावई माझा भला' (१९६३) व 'घर - गंगेच्या काठी' (१९७५) या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. पुढे त्यांची चित्रपट निर्मिती जरी थांबली तरी मराठी चित्रपट सृष्टीशी असणारा त्यांचा ऋणानुबंध कायम राहिला. 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. नंतर कलाकारांसाठी ते जणू आधारवड झाले!

'घर गंगेच्या काठी' (१९७५) चित्रपटाचे पोस्टर!
स्पष्ट नि परखड मत व्यक्त करणाऱ्या त्यांच्या बोलण्यात भावनेचा ओलावाही असे! मला आठवतंय बाळासाहेब - सरपोतदार यांच्या (बहुदा) एकसष्टी निमित्त आम्ही काही निवडक सिने - पत्रकारांनी त्यांचा 'पुणे गेस्ट हाऊस' वर अनौपचारीक सत्कार केला होता. त्या वेळी बासुंदी-पुरी चा बेत चारुकाकांनी तिथे ठेवला होता आणि आग्रह करून स्वतः वाढत होते! नंतर त्यांच्या परीवारा तर्फे मराठी चित्रपटांसाठी 'नानासाहेब - सरपोतदार पुरस्कार' सुरु करताना मराठी चित्रपट इतिहासकार बापू वाटवे यांच्यासह तिथे झालेली बैठक आठवते!

कालांतराने २००२ मध्ये माझा 'चित्रसृष्टी' अंक सुरु झाला..तेंव्हा प्रकाशन समारंभास स्नॅक्स-कॉफी ची ऑर्डर 'पुणे गेस्ट हाऊस' कडेच (त्यांनी ठरवल्या प्रमाणे) दिली होती. नंतर याच्या विशेषांकासाठी कोल्हापुर व पुणे चित्रपट सृष्टीवर विशेष लेख करतांना त्यांच्याशी सखोल चर्चा झाली होती! पुढे मग क्वचित अशाच सदिच्छा भेटी होत..त्यांत त्यांचे पुत्र किशोर सरपोतदार यांच्याशीही जिव्हाळ्याने बोलणे होई!

त्यांना सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment