Tuesday 17 August 2021

सदाबहार मराठी स्टार सचिन..६० +!

पत्नी सौ. सुप्रियासह सचिन पिळगांवकर...दोघांचेही पाठोपाठ वाढदिवस!

रूपेरी पडद्यावर अभिनयाचा सुवर्णमहोत्सव साजरा केलेल्या अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांचा आज ६ वा वाढदिवस!..तर त्यांच्या पत्नी-अभिनेत्री सौ. सुप्रिया पिळगांवकर यांचा ५४ वा वाढदिवस काल झाला!

'हा माझा मार्ग एकला' (१९६२) मध्ये बालकलाकार सचिन!
अवघे चार वर्षे वय असताना प्रतिथयश दिग्दर्शक राजा परांजपे यांच्या 'हा माझा मार्ग एकला' - (१९६२) या मराठी चित्रपटाद्वारे सचिनने रूपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. त्याला सांभाळणाऱ्या व्यसनी पण सहृदय माणसाची भूमिका
यात रंगवणाऱ्या राजाभाऊंना बोबड्या बोलात "पुन्हा औषध (दारू) पिले तर मी बोलणार नाही!" असे सुनावणारा तो लहानगा सचिन ह्रदय हेलावून गेला! यातील अभिनयासाठी त्यास 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!

यानंतर लगेचच सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश - मुखर्जी यांच्या 'मझली दीदी' (१९६७) द्वारे सचिन चे हिंदी चित्रपटात पदार्पण झाले. प्रख्यात बंगाली लेखक शरत्तचन्द्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरी वर आधारित या चित्रपटात मीनाकुमारी सारख्या समर्थ अभिनेत्री बरोबर त्यास काम करायला मिळाले! मराठीत दिग्दर्शक राजा परांजपे आणि हिंदीत अभिनेत्री मीना कुमारी यांच्याकडून दिग्दर्शन व अभिनयाचे आपल्यावर झालेले संस्कार नंतर सचिनने कृतज्ञपणे नमूद केलेत!

'गीत गाता चल' (१९७५) मध्ये सचिन व सारीका..
दोघांचाही नायक-नायिका म्हणून पहिला चित्रपट!
यानंतर अनेक हिंदी चित्रपटांतून मास्टर सचिन म्हणून त्याने भूमिका केल्या. यांत शम्मी कपूर व राजश्री बरोबरील - 'ब्रह्मचारी' (१९६८) मधील त्याची गोंडस छबि अजुन डोळ्यासमोर आहे. यात त्याच्या बरोबर इरसाल मुलगा रंगवलेल्या ज्युनियर मेहमूद बरोबर त्याची चांगली गट्टी जमली आणि त्यांनी १५ चित्रपटांतून बरोबर काम केले..यांतच 'अजब तुझे सरकार' (१९७१) मधील - अभिनयासाठी सचिनला पुन्हा 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!

१९७५ मध्ये 'राजश्री प्रोडक्शन' च्या 'गीत गाता चल' या चित्रपटाने सचिनला सर्वप्रथम नायक केले. यात मोहक निळ्या डोळ्यांची षोडशा सारीका त्याची नायिका झाली..बालकलाकार म्हणून पडद्यावर आलेल्या तिचेही नायिका म्हणून हे पहिलेच सुरेख दर्शन होते! सचिन-सारीका ही जोड़ी गाजली आणि त्यांनी 'ज़िद' (१९७६), 'मधु मालती' (१९७८) व 'जान-ए-बहार' (१९७९) अशा चित्रपटांतून प्रणयी युगुल साकारले! हिंदी बरोबरच 'नदिया के पार' (१९८२) सारख्या भोजपुरी चित्रपटातून साधना सिंह बरोबर त्याने नायकाची उत्तम भूमिका रंगवली!

'अष्ट विनायक' (१९७९) या मराठी चित्रपटात सचिन आणि वंदना पंडित!
वडील शरद पिळगांवकर यांनी निर्मिलेल्या 'अष्ट विनायक' (१९७९) ने मराठी चित्रपटात नायकाची यशस्वी वाटचाल सचिनने सुरु केली. पुढे 'माय बाप' (१९८२) पासून त्याने दिग्दर्शनही सुरु केले. याच दरम्यान त्याने दिग्दर्शित केलेल्या 'नवरी मिळे नवऱ्याला' (१९८४) चित्रपटातील त्याची नायिका असलेल्या सुप्रिया सबनीस बरोबर त्याचा विवाह झाला आणि हे शिर्षक सार्थ ठरले! मग 'अशी ही बनवाबनवी' (१९८८) सारखे विनोदी तर 'आत्मविश्वास' (१९८९) सारखे सामाजिक व 'आयत्या घरात घरोबा' (१९९१) सारखे मार्मिक असे 'एकापेक्षा एक' यशस्वी चित्रपट तो दिग्दर्शित करीत गेला. तसेच आपल्या चित्रपटातील गाणीही गायला लागला!

नंतर त्याने निर्माते सुभाष घई यांच्यासाठी 'प्रेम दीवाने' (१९९२) हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. जॅकी श्रॉफ, विवेक मुश्रन, पूजा भट्ट व माधुरी दीक्षित यांच्या भूमिका असणारा हा संगीत-प्रणय प्रधान चित्रपट यशस्वी ठरला! पुढे 'तू तू मैं मैं' (१९९४ ते २०००) सारखी यशस्वी हिंदी मालिका दिग्दर्शित करून त्याने दूरचित्रवाणीचा छोटा पडदा पण काबिज केला..सासु-सुनेचा फार्स असणाऱ्या या मालिकेत सुप्रिया पिळगांवकर व रीमा लागू यांनी उत्तम भूमिका रंगवल्या!

'एकुलती एक' (२०१३) मध्ये कन्या श्रिया पिळगांवकर बरोबर सचिन!
मराठी, हिंदी बरोबरच 'नवरा माझा नवसाचा' (२००४) या आपल्याच चित्रपटावरून त्याने 'एकदंता' (२००७) हा कन्नड़ चित्रपटही दिग्दर्शित केला! पुढे 'एकुलती एक' (२०१३) हा मराठी चित्रपट निर्माण करून सचिनने आपली कन्या श्रिया ला पडद्या वर आणले!

अलिकडे आलेल्या 'कट्यार - काळजात घुसली' (२०१६) या गाजलेल्या नाटकावर आधारीत चित्रपटात सचिनने साकारलेली खाँसाहेबांची भूमिका गाजली व त्यास पुरस्कार ही लाभले! या आधीही 'फिल्मफेअर' व राज्य सरकारचे पुरस्कार त्यास मिळाले होते. 'हाच माझा मार्ग' हे सचिन यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले!

'कट्यार काळजात घुसली' (२०१६)
चित्रपटात सचिन पिळगांवकर!
त्यांच्या चित्रपट प्रसंगी सचिनजींशी झालेल्या भेटी आठवतायत..आणि माझा 'चित्रसृष्टी' चा मराठी चित्रपट विशेषांक व त्यातील आपल्या विषयीचे पाहून त्यांनी दिलख़ुलास केलेली चर्चाही!

अशा या सदाबहार अष्टपैलू कलाकारास माझ्या हार्दिक शुभेच्छा!!
त्याचबरोबर सौ. सुप्रिया पिळगांवकर यांसही शुभेच्छा!!!

 
- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment