Sunday 29 August 2021

माध्यमवाले नि मराठी!

(आज मराठी भाषा दिन नसून, या लेखास समर्पक छायाचित्र आढळल्याने ते इथे वापरले!)


मराठी आणि एकूणच भाषांच्या स्वरूप नि अस्तित्वाबाबत मी मागे (चित्रपट/कला/साहित्य या अनुषंगाने) बरेच लिहिले आहे. पण वेळोवेळी मराठी भाषा च्या तारणहार म्हणवणाऱ्यां कडून होत असलेली तिची कुचंबणा पाहून पुन्हा त्या बाबत लिहिल्या शिवाय राहवत नाही!

'सदर' शब्द 'कॉलम' या इंग्रजीत नियमित स्तंभलेखनास वापरणाऱ्या शब्दासाठी आहे; पण इथे तो तर गायब होतोच आणि त्या सदारांची शीर्षके देखील इंग्रजीत पाहायला मिळतांत. काही मराठी वृत्तपत्रांची नावे देखील इंग्रजीत आहेत तिथे याचे काय!

पूर्वी पुण्यात एका व्याख्यानास गेलो असता तिथे प्रख्यात मराठी दैनिकाच्या साप्ताहिकाचे संपादक इंग्रजीत भाषण देत होते..ते ऐकून कान किटलेल्या सदाशिव पेठी उच्चशिक्षित महिला एकमेकांत कुजबुजताना मी ऐकले "हा बाबा करतो - काम मराठी साप्ताहिकात..आणि कशाला उगाच इंग्रजी बोलतोय!"

मराठी च्या संवर्धनाबाबत परिसंवाद वारंवार ठेवणारे 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' पुण्यात भरले असता परिचयाची मराठी महिला पत्रकार तिथे भेटताच मला "हाय!" म्हणाली (मनात म्हंटलं 'इथे तरी 'नमस्कार', 'नमस्ते' म्हणायचं!'). तर एक नामांकित मराठी अभिनेत्री एका मुलाखतीत असे म्हणाली होती की "मी इंग्रजीत विचार करते आणि मग मराठीत त्यानुसार बोलते नि वागते!"

बहुतेक मराठी चित्रपट व नाटके यांची नावे आता सर्रास इंग्रजीत असतात. त्यांत कितपत वैश्विक मराठी चित्र दिसतं तो भाग सोडा! मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यां वर तर बऱ्याचदा वाट्टेल तसे मराठी रेटले जाते. वृत्त वाहिन्यां वर ही व्याकरण धाब्यावर बसवलेले आढळतें! आता सर्वसाधारण पणे मराठी भाषा दिन, गुढी पाडवा यांच्या शुभेच्छा ही इंग्रजीत येतांत!

आता हे वाचल्यावर काही म्हणतील की 'तुम्ही तर हिंदी आणि इंग्रजीत लिहिता!" पण मी पस्तीस वर्षे मराठी भाषेतून चित्रपट विषयक लिखाण करीत आलोय. गेली काही वर्षे व्याप्ती वाढविण्यासाठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहितोय. तर हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे..आणि मी काही मराठीचा 'वृथा अभिमान' बाळगत नाही!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment