Tuesday 30 March 2021

परदेशी गौरविलेला पहिला भारतीय चित्रपट 'संत तुकाराम'..८५!

तसा मी धार्मिक नाही, पण 'प्रभात फिल्म कंपनी' ने निर्मिलेल्या पुरोगामी संतचरित्रावरील 'संत तुकाराम' (१९३६) या चित्रपटाची आठवण आज झाली! 'व्हेनिस चित्रपट महोत्सवा'त 'उत्कृष्ट चित्रपट' म्हणून गौरविलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट, ज्यास ८५ वर्षे पूर्ण होतायत!

'संत तुकाराम' (१९३६) चित्रपटात विष्णुपंत पागनीस व शंकर कुलकर्णी!
 
शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या पटकथेवर 'प्रभात फिल्म कं.' चे दिग्गज चित्रकर्ते विष्णुपंत दामले आणि शेख फत्तेलाल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 
 
मूळ कीर्तनकार असलेल्या विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांची व्यक्तिरेखा यात हुबेहूब साकारली होती आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत गौरी यांनी मोठे समरसून काम केले होते. तर अन्य भूमिकांत पंडित दामले, कुसुम भागवत, शंकर कुलकर्णी, शांता मजुमदार, बी. नांदेकर, मा. छोटू व सालोमालो केशव भागवत होते!

'संत तुकाराम' (१९३६) चित्रपटातील गाथा डोहात नेतानाच्या प्रसंगात विष्णुपंत पागनीस!
 
पुण्याच्या तत्कालिन (आता 'फिल्म इन्स्टिटयूट' झालेल्या) 'प्रभात फिल्म स्टुडिओ'त याचे चित्रीकरण व्ही. अवधूत यांनी अतिशय स्वाभाविक नि वेधक केले होते. विशेष उल्लेखनीय प्रसंग म्हणजे..गाथा डोहात घेऊन जातानाचा व गरुड विमानाचा क्लायमॅक्स! शंकरराव दामले यांनी चित्रपटाचे ध्वनिमुद्रण केले होते आणि ए. आर. शेख यांनी फिल्म संपादित केली होती.

'संत तुकाराम' (१९३६) चित्रपटात तल्लीन होऊन अभंग गाताना विष्णुपंत पागनीस!
कवी शांताराम आठवले यांचे यासाठीचे गीतलेखन इतके प्रतिभासंपन्न होते की लोकांना ते मूळ अभंगच वाटले! केशवराव भोळे यांच्या भावपूर्ण संगीतात स्वतः विष्णुपंत पागनीसांनीच ती भावमधुर गीते गायली होती. त्यांचे छायाचित्र हे बराच काळ संत तुकाराम म्हणूनच भावुक लोकांच्या स्मृतीत राहिले!

तर 'प्रभात' इतिहासकार बापू वाटवे यांनी मला सांगितलेली आठवण म्हणजे, 'शिकस्त' (१९५३) या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणा साठी दिलीपकुमार 'प्रभात स्टुडिओ'त होता, तेंव्हा तो 'संत तुकाराम' चे "आधी बीज एकले.." गुणगुणायचा!
 
आज तुकाराम बीज दिनी या श्रेष्ठ चित्रकृतीस प्रणाम!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment