Sunday 7 March 2021

दिग्गज मनस्वी अभिनेते श्रीकांत मोघे!

 
मराठी नाट्य-चित्रपट सृष्टींतील दिग्गज अभिनेते श्रीकांत मोघे हे जग सोडून गेले!

आकाशवाणी वरील वृत्तनिवेदक ते रंगभूमी, रूपेरी पडदा मालिका यांतून अभिनय असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास! रंगभूमीवर कानेटकरांच्या 'लेकुरे उदंड झाली' आणि पुलंच्या 'वाऱ्यावरची वरात' नाटकांतून त्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्व खेळकर वावर याची प्रचिती आली. (हे तेंव्हा आम्ही टीव्ही वर पाहिले) तर 'स्वामी' मालिकेतून ते राघोबादादांच्या खलनायकी भूमिकेत दिसले!

'आम्ही जातो आमुच्या गावा' (१९६८) चित्रपटातील "हवास तू.." गाण्यात उमा व श्रीकांत मोघे!
गुलछबू नायक अशी त्यांची पडद्या वरील प्रतिमा होती आणि बोलण्या तुन एक प्रकारचा लाडीक सूर निघे! प्रख्यात लेखक मधुसूदन कालेलकर यांच्या कथांवर प्रतिथयश दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी काढलेल्या 'आम्ही जातो आमुच्या गावा' (१९६८) व 'अनोळखी' (१९७३) यां चित्रपटांतून हे दिसून आले. 
यांत पहिल्या मधील "हवास तू." गाण्या तील मोहक नायिका उमा व (तोतरे बोलणारा विनोदी) मधू आपटे यांच्याबरोबर भन्नाट प्रसंग अजून लक्षात आहे. तर दुसऱ्यात दुकानदाराला "सेव्हन ओ'क्लॉक ब्लेड द्या!" असे काहीसे म्हणणारा त्यांचा आविर्भाव अफलातून होता!

ऐतिहासिक नाटकात भारदस्त श्रीकांत मोघे!
कालांतराने त्यांनी पडद्यावर विविधरंगी भूमिका रंगवल्या. समांतर चित्रपटकर्ते जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' (१९७९) मध्ये ते ग्रामीण पुढारी होते, तर 'उंबरठा' (१९८२) मध्ये डॉक्टर! दरम्यान 'अंजाम' (१९७८) सारख्या हिंदी चित्रपटांतूनही ते दिसले. पुढे सचिनच्या 'गंमत जंमत' (१९८७) आणि वर्षा उसगांवकर व प्रशांत दामले यांच्या 'पसंत आहे मुलगी' (१९८९) सारख्या चित्रपटांतून ते वयास साजेश्या पण खुमासदार भूमिका करू लागले. अखेर ऐतिहासिक 'वासुदेव बळवंत फडके' (२००७) व समकालिन 'किल्लारी' (२०१५) चित्रपटांतून त्यांनी लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारल्या!

पुण्यात मराठी चित्रपट विषयक सांस्कृतिक कार्यक्रमांस ते बहुतेकदा बेबी शकुंतला व मधू आपटे यांच्यासह रिक्षातून आल्याचे मला आठवते! रंगभूमीवरील त्यांची आस्थाही मी जवळून अनुभवली ती 'थिएटर ऍकॅडमी' रौप्य महोत्सवाच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात..यांत प्रख्यात बंगाली नाट्यकर्मी शंभू मित्रा यांच्या पायाशी बसून ते चर्चा करीत होते! त्या वयातही त्यांचे ते विनयशील वागणे नि आपल्या क्षेत्रातील दिग्गजाचा मान राखणे हे नव्या पिढीतील कलावंतांना शहारून गेले!

राष्ट्रीय पुरस्कार व पहिला राज्य पुरस्कार मिळालेल्या 'प्रपंच' (१९६१) या बाबा पाठक यांच्या सामाजिक मराठी चित्रपटात श्रीकांत मोघे यांची लक्षणीय भूमिका होती!

राज्य सरकार व नाट्य परिषदेचे पुरस्कार श्रीकांत मोघेंना लाभले. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले!

अशा दिग्गज निगर्वी नि मनस्वी अभिनेत्यांस माझी आदरांजली!!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment