Saturday, 18 April 2020

आठवण गबालेंच्या 'देवबाप्पा' चित्रपटाची!

"नाच रे मोरा.." हे बालगीत 'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटात करताना मेधा गुप्ते व बालमैत्रिणी!

"देवबाप्पा, कोरोना लवकर जाऊदे..मला बाहेर खेळायला जायचंय!" असं म्हणणारी दूरदर्शन वरील चिमुकली पाहताच मला राम गबाले यांच्या 'देवबाप्पा' (१९५३) या चित्रपटात देवाला पत्र लिहिणारी लहानगी आठवली!

'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटात विवेक व चित्रा यांमध्ये मेधा गुप्ते!
प्रख्यात लेखक पु.ल. देशपांडे व ग.दि. माडगुळकर
कुणाचे निधन झाले तर लहान मुलांना जसे सांगतात की 'देवाघरी गेले'.. तसेच यातील विधवा आई आपल्या लहान मुलीला सांगते.. तेंव्हा ती तिथल्या पत्त्यावर वडिलांना पत्र लिहिते!..प्रेम माणिक यांनी ही कथा लिहिली आणि पटकथा-संवाद लिहिले ते पु. ल. देशपांडे यांनी!

'देवबाप्पा' (१९५३) चित्रपटाचे..
संवेदनशील दिग्दर्शक राम गबाले!
या चित्रपटातील.. 
ग. दि. माडगुळकर यांचे पु. लं. देशपांडे यांनीच संगीत दिलेले व आशा भोसले यांनी गायलेले बालगीत.. "नाच रे मोरा s.. आंब्याच्या वनात.." हे अजरामर झाले! अन यावर मोराचा पिसारा लेवून नाच करणारी ती चिमुकली सुद्धा..मेधा गुप्तेनी ती भूमिका फारच छान केली होती. तर चित्रा, विवेक आणि इंदिरा चिटणीस हे कलाकार तिच्या बरोबर यात होते.

माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकाच्या प्रकाशन समारंभास राम गबाले जी अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्याशी चांगला 'जिव्हाळा' वृद्धिंगत झाला. मग ते 'देवबाप्पा' चित्रीकरणावेळच्या लहान मेधा गुप्तेच्या गमती-जमती सांगायचे!

आज या काळात सुद्धा ही भाबडी कल्पना अस्तित्वात आहे ही आपल्या निरागस संस्कृतीचं लक्षण असावं!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment