Friday, 30 April 2021

 फाळकेंना वंदन!

पत्नी सरस्वतीबाईंसह..दादासाहेब फाळके!

आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज १५१ वी जयंती!
१९१३ साली 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय कथा चित्रपट त्यांनी निर्माण केला!


दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली निर्माण केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट!

महाराष्ट्राची अस्मिता मराठी बाण्याचा अभिमान असणाऱ्यांनी आता तरी..प्रादेशिक सीमा ओलांडून, आपला भारताचा स्वदेशी राष्ट्रीय सिनेमा निर्माण करणाऱ्या..दादासाहेब फाळके यांना 'भारतरत्न' मिळण्यासाठी दिल्ली दरबारी आवाज उठवावा!

जयंतीदिनी त्यांस विनम्र अभिवादन!!

- मनोज कुलकर्णी

Sunday, 25 April 2021

चित्रपट विषयक लेखन/बोलणे ज्ञानाधिष्टित असावे!


प्रादेशिक आणि त्यांतूनही मराठी मधून चित्रपट विषयक विश्लेषणात्मक लिखाण आणि (साचेबद्धता टाळून) अभ्यासपूर्ण समीक्षा ही अतिशय अभावाने आढळते! 

सरधोपट जंत्री पद्धतीचे विस्कळीत लेखन करणारेच इथे नि तिथे दिसतात. मुंबईत वर्षोनुवर्षे असे वृत्तपत्रातले रकाने भरणारे (एक-दोनच) वारंवार मराठी वृत्त वाहिन्यांतून चित्रपट विषयक चर्चांमधून (पेड रतीब टाकतात) आपले "दिव्य ज्ञान" पाझळतात! तर काही वयस्क आजवर फक्त 'टवाळा आवडे विनोद' या उक्ती प्रमाणे (त्यांच्या नुसार मिश्किल) विक्षिप्त लिहीत नि त्याचे कार्यक्रमही करीत आलेत!

प्रति सृष्टी दर्शवणारे नि समाज प्रबोधनाची प्रचंड ताकद असणारे चित्रपट हे सर्वसमावेशक परिपक्व नि सर्वांत प्रभावी कला माध्यम आहे. त्याचा इतिहास, विकास नि सर्व तांत्रिक बाबी समजून घेऊन; त्यानुसार विश्लेषण करून त्यावर गांभीर्यपूर्वक लेखन नि बोलणे होण्याची गरज आहे. ते चित्रपट माध्यमाच्या योग्य प्रसारासाठी नि विकासासाठी पूरक ठरेल. हे माझे मत न राहवून अखेर व्यक्त करावेसे वाटले!

- मनोज कुलकर्णी

Monday, 19 April 2021

भावपूर्ण आदरांजली!!


सामाजिक मराठी चित्रपटाशी निरंतर निगडित राहिलेल्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन झाल्याचे वृत्त हे तसे धक्कादायक नि दुःखद!

माझ्या महाविद्यालयीन, म्हणजे १९८३ च्या काळातील चित्रपट रसग्रहण विषयक 'चित्रदर्शन' उपक्रमापासून त्यांचा (व सुनील सुकथनकरचा) माझा परिचय होता. तो पुढे माझ्या चित्रपट पत्रकारितेतच्या प्रवासात त्यांच्या 'दोघी', 'नितळ' ते 'संहिता', 'वेलकम होम' पर्यंतच्या अनेक सामाजिक चित्रकृतींवर लिहीत वृद्धिंगत होत गेला! या संदर्भात मी तीन वर्षांपूर्वी 'आम्ही चित्रपट प्रवासी!' हा लेख लिहिला होता.

त्यांना आदरांजली म्हणून तो लेख कृपया इथे माझ्या 'चित्रसृष्टी' (मराठी) ब्लॉग वर दि. ११ एप्रिल, २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला बघावा/वाचावा!

- मनोज कुलकर्णी

Tuesday, 13 April 2021

चैत्रारंभ
..!

"चैत्रातील हा नव वर्षारंभ
घेऊन येवो नव चैतन्य..!
'वसुधैव कुटुंबकम्' विचारानं
सर्व मानवजातीच्या प्रगतीचं!
धर्म-जात सर्व भेद विसरून..
प्रेम, स्नेह भाव रुजवण्याचं!"

- मनोज 'मानस रूमानी'